मृत्यूचे तांडव: चिंतामणी ट्रॅव्हल्सचा नाशिकजवळ भीषण अपघात, 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

पहाटे 5 वाजताच्या सुमारास अपघात, 38 प्रवासी जखमी....

बहुगुणी डेस्क: यवतमाळहून मुंबईला जाणा-या यवतमाळ येथील चिंतामणी ट्रॅव्हल्सचा नाशिक मार्गावर नांदूर फाट्याजवळ भीषण अपघात झाला. आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातानंतर बसमध्ये आग लागल्याने 11 प्रवाशांचा होळपळून मृत्यू झाला तर सुमारे 38 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस शुक्रवारी दुपारी यवतमाळहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. प्राथमिक माहितीनुसार ही खासगी बस व एका आयशर ट्रकचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर बसला भीषण आग लागली. आगीचा भडका क्षणात संपूर्ण बसच्या भोवती पसरला. संपूर्ण बसला आगीने आपल्या कवेत घेतलं आणि प्रवाशांना जीव वाचण्यासाठी संधीही मिळाली नाही. पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रत्यक्षदर्शींनुसार, अतिशय भयंकर अशी ही आग होती. पूर्ण बस पेटलेली असताना प्रवासी खिडक्यांमधून उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. बसमधील लोकांना बाहेर पडायला मार्ग नव्हता. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार ते पाच बंबांनी त्या ठिकाणी धाव घेतली. यानंतर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यानच्या काळात अनेक प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे.

चिंतामणी ट्रॅव्हल्सचे मालक पुसद येथील नीरज जैस्वाल यांनी माध्यमांना सांगितले की, ही बस यवतमाळहून मुंबईसाठी काल दुपारी साडेतीनच्या सुमारास निघाली होती. बसमध्ये 30 प्रवासी होते. मला पहाटे पाच-साडेपाचच्या दरम्यान चालकाने फोन करून अपघाताची माहिती दिली. नातेवाइकांशी अद्याप संपर्क झालेला नसून त्यांच्याशी संपर्क सुरू आहे. त्यांनी गाडीचे फिटनेस सर्टिफिकेटही पूर्ण असल्याचा दावा केला. याशिवाय गाडीत फायर एक्स्टिंग्विशरही होते, असेही ते म्हणाले.

मृतांच्या नातेवाइकांना 5 लाखांची मदत जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. याबरोबरच मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जातील अशीही घोषणाही त्यांनी केली आहे.

बस अपघातातील जखमींची नावे

  • १. अमित कुमार – वय ३४
  • २. सचिन जाधव – वय ३०
  • ३. आश्विनी जाधव – वय २६
  • ४. अंबादास वाघमारे – वय ४३
  • ५. राजू रघुनाथ जाधव – वय ३३
  • ६. निलेश प्रेमसिंग राठोड – वय ३०
  • ७. भगवान श्रीपत मनोहर – वय ६५
  • ८. संतोष राठोड – वय २८
  • ९. हंसराज बागुल – वय ४६
  • १०. डॉ. गजकुमार बाबुलाल शहा – वय ७९
  • ११. त्रिशिला शहा – वय ७५
  • १२. भगवान लक्ष्मण भिसे – वय ५५
  • १३. रिहाना पठाण – वय ४५
  • १४. ज्ञानदेव राठोड – वय ३८
  • १५. निकिता राठोड – वय ३५
  • १६. अजय देवगण – वय ३३
  • १७. प्रभादेवी जाधव – वय ५५
  • १८. गणेश लांडगे – वय १९
  • १९. पूजा गायकवाड – वय २७
  • २०. आर्यन गायकवाड – वय ८
  • २१. इस्माईल शेख – वय ४५
  • २२. जयनुबी पठाण – वय ६०
  • २३. पायल शिंदे – वय ९
  • २४. चेतन मधुकर
  • २५. महादेव मारुती
  • २६. मालू चव्हाण – वय २२
  • २७. अनिल चव्हाण – वय २८
  • २८. दीपक शेंडे – वय ४०

माहिती स्रोत – मीडिया रिपोर्स….

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.