रंगारीपु-यात रंगला थरार… सिनेस्टाईल पाठलाग करून चोरट्यास पकडले

मध्यरात्री चोरट्याचा दुचाकीवर डल्ला... साथीदार पळून जाण्यात यशस्वी....

विवेक तोटेवार, वणी: दुचाकी चोरीचा प्रयत्न करीत असताना एका चोरट्याला लोकांनी रंगेहात पकडले. रंगारी पु-यात रविवारी मध्यरात्री हा थरार घडला. वार्डातील नागरिकांनी पाठलाग करून एकाला ताब्यात घेतले. मात्र चोरट्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की मयूर देवराव बदकी (31) रा. रंगारीपुरा वणी हे एलआयसी ऑफिस वणी येथे कार्यरत आहे. त्यांच्या मालकीची स्वत:ची होन्डा शाईन (mh-29 BA 2815) ही दुचाकी आहे. रविवारी दि. 4 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास त्यांनी घरासमोरील गल्लीत गाडी ठेवली व ते लघुशंकेसाठी बाथरुममध्ये गेले. दरम्यान त्यांना दोन अनोळखी ईसम लोखंडी पेचकसने मोटर सायकलचे लॉक तोडून मोटर सायकल चोरुन नेण्याचा प्रयत्न करताना आढळले.

त्यामुळे मयूर यांनी चोर चोर असा आवाज देताच दोघेही पळू लागले. दरम्यान आरडाओरड झाल्याने घराशेजारी घराबाहेर आले. दरम्यान शेजा-यांनी पाठलाग करून एकाला पकडले तर दुसरा फरार होण्यात यशस्वी झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काहींनी हाती आलेल्या इसमाची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव महेश सुरेश पाटकुलवार वय 27 वर्ष रा. कोरपना जि चंद्रपूर असे सांगीतले.

घटनास्थळावरील लोकांनी डायल 112 वर फोन केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. मयूर यांच्या तक्रारीवरून मोटारसायकल (किंमत 20 हजार रुपये) चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी महेश सुरेश पाटकुलवार विरोधात भादंविच्या कलम 379 व 511 गुन्हा दाखल केला. पोलीस दुस-या आरोपीचा शोध घेत असून प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बाहेरगावातील चोरटे वणीत !
वणीकर दुचाकी चोरट्यांमुळे त्रस्त झाले आहे. क्वचित वेळी एखादा चोरटा पोलिसांच्या हाती लागायचा. मात्र यावेळी चोरट्याला नागरिकांनी पकडल्याने अनेक दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा छडा लागू शकतो. दरम्यान चोरटे हे बाहेरगावातील असल्याने बाहेरगावाहून फक्त चोरी करण्यासाठी चोरटे येत असल्याचे सिद्ध झाले आहे.

हे देखील वाचा: 

लालपुलिया परिसरात भीषण अपघात, 1 महिला ठार तर दोघे जखमी

Comments are closed.