लालपुलिया परिसरात भीषण अपघात, 1 महिला ठार तर दोघे जखमी

दोन दुचाकी समोरासमोर भिडल्या, गावी परतताना काळाचा घाला...

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ रोडने वणीकडे येताना लालपुलिया परिसरातील कळमना फाट्या जवळ दोन दुचाकी समोरासमोर भिडल्या. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर दोन्ही दुचाकी चालक जखमी झाले. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सुनंदा उत्तम रामटेके (52) असे अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या राजुरा येथील रहिवासी होत्या.

सविस्तर वृत्त असे की सुनंदा या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील रहिवासी होत्या. त्या दोन दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा गौरव रामटेके (27) यांच्या सोबत स्प्लेंडर या दुचाकीने (Mh 34 BQ 3609) पांढरकवडा येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या. आज मंगळवारी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास त्या मुलासह गावी परत चालल्या होत्या. तर किशोर सुरेश गेडाम (34) हा धोपटाळा येथील रहिवासी आहे. तो त्याच्या स्प्लेंडर या दुचाकीने (MH29 BZ 3805) कामानिमित्त लालपुलिया परिसरात चालला होता.

10 वाजताच्या सुमारास लालपुलिया परिसरातील कळमणा फाट्याजवळ किशोर यु टर्न घेत होता. त्याच वेळी गौरव हा दुचाकीने जात होता. दरम्यान दोन्ही दुचाकींची समोरा समोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की मागे बसलेल्या सुनंदा या उचळून डिव्हायडरवर पडल्या. डिव्हायडरवर त्यांचे डोके आदळले गेले. ब्रेन इन्ज्युरी आणि रक्तस्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा गौरव हा जखमी झाला. तर दुस-या दुचाकीचा चालक किशोर हा देखील जखमी झाला. दोघांच्याही डोक्याला मार लागला. घटनास्थळावरील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

दोन्ही जखमींना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

सर्वसामान्यांना माती मिश्रीत रेती तर चांगली रेती अधिक पैसे देणा-याच्या घशात

Comments are closed.