कोळसा-डोलोमाईट खदानीचा पंचनामा

ग्रामस्थांनी वाचला अंदाज समितीपुढे पाढा

0

सुशील ओझा, झरी : विधान मंडळस्तरीय अंदाज समितीच्या काही सदस्यांनी शुक्रवारी आपला मोर्चा आदिवासी बहुल झरी तालुक्याकडे वळविला होता. मार्की, अर्धवन, पांढरकवडा (ल.) परिसरातील कोळसा व डोलोमाईट खदान प्रकल्पांना समितीने भेटी दिल्या. खदानीतून होणारे अवैध उत्खनन, ओव्हरलोड वाहतूक, प्रदूषण, खड्डेमय रस्ते अशा समस्यांचा पाढा या भागातील ग्रामस्थांनी समितीपुढे वाचला.

झरी तालुक्यातील पांढरकवडा (ल) गावाजवळील टॉपवर्थ कोळसा खदानीला अंदाज समितीने आज भेट दिली. तब्बल २० ते २५ वाहनांचा ताफा धडकताच डब्ल्यूसीएलची यंत्रणा सतर्क झाली. समितीप्रमुख आ. अनिल कदम, सदस्य आ. उन्मेश पाटील, आ. संजय रायमूलकर, आ. संजय बुंदिले, आ. वसंत चव्हाण, सहसचिव अशोक मोहिते आदी सदस्यांनी कार्यालयात बसून कोळशाची वाहतूक, प्रदूषण आदी बाबी संदर्भात माहिती घेतली. यावेळी आझाद उदकवार, जयंत उदकवार, चेतन मॅकलवार, गजानन मॅकलवार या ग्रामस्थांनी जड वाहतुकीमुळे मार्की,अर्धवन, पांढरकवडा (ल.) या भागातील रस्त्याच्या दुर्दशेकडे आमदारांचे लक्ष वेधले. मोठमोठ्या खड्ड्यामुळे कोळसा खदानीचे व्यवस्थापन शेकडो जीवांशी खेळत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.

प्रदूषणामुळे श्वसनसंस्थेचे आजार बळावल्याचेही सांगण्यात आले. तहसील कार्यालयात खड्डेमय रस्ते व जड वाहतुकीसंदर्भात बैठका होऊनही उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रारही करण्यात आली. पांढरकवडा (ल) ग्रामपंचायतचे सदस्य बालू चेडे, दीपक चेडे, रूपेश पावडे यावेळी आक्रमक झाले होते. स्थानिकांना कोळसा कंपन्या रोजगार देत नाही. कोळशामुळे जलप्रदूषणही वाढले असताना त्यासाठी कुठले नियंत्रण कंपनीकडून ठेवले जात नाही, असेही आरोप ग्रामस्थांनी केले. या दौऱ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य आशीष कुळसंगे, वनविभाग, खनिकर्म, सार्वजनिक बांधकाम, उत्पादन शुल्कचे अधिकारी उपस्थित होते. .

अडेगावच्या इशानवर धडक
अंदाज समितीने अडेगावातील ‘इशान’ मिनरल या डोलोमाईट खदानीवर धडक दिली. याठिकाणी वाहतूक व्यवस्थेसह प्रदूषणाची माहिती समितीने घेतली. तद्नंतर वणी तालुक्याकडे समितीने मोर्चा वळविला. तेथीलही खदानीची पाहणी समिती सदस्यांकडून करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.