विवेक तोटेवार, वणी: रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास वणी नॉर्थ क्षेत्रातील निलजई कोळसा खाणीतून कोळसा चोरी करणाऱ्या दोन वाहनांना वणी पोलिसांनी जप्त केले आहे. सोमवारी रात्री उशिरा अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांंनी दोन वाहन चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
वणी तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात खनिज संपत्ती आहे. त्यामध्ये कोळसा महत्वाचा आहे. आता चोरट्यांनी या खनिज संपत्तीकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. रविवारी रात्री वणी पोलिसांना खाणीतून कोळसा चोरी जात असल्याची माहिती मिळाली. ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी पोलिसांनी पाचारण केले. पोलिसांनी निलजाई खाणीतून तीन पीक अप वाहने कोळशाने भरलेले आढळून आले. पोलिसांनी गाडी अडवून तपासणी केली असता त्यामध्ये 6 ते 7 टन कोळसा आढळून आला. ज्याची किंमत अंदाजे 35 हजार रुपये आहे.
पोलिसांनी त्वरित कारवाई करीत दोन वाहनांना जप्त करून वाहन पोलीस ठाण्यात जमा केले. तिस-या वाहनाचा टायर नादुरुस्त असल्याने त्या वाहनाला जागीच ठेवण्यात आले. नंतर ते वाहने शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पोलिसांनी वेकोलीचे सुरक्षा रक्षक संदीप सुधाकर निमकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्यावर कलम 379, 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर पोलिसांनी वाहन चालक स्वप्नील विजय चिडे (20) व साहिल कमरून अन्सारी (20) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर गडामोडे करीत आहे.
कोळसा तस्करीला कुणाचे पाठबळ ?
वेकोली रक्षक कर्तव्यावर असतांना खाणीतून कोळसा चोरी होतो तरी कसा? हे न उलगडणारे कोडे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोळसा खाणीतून कोळसा चोरी होत असल्याच्या बातम्या प्रकाशित होत आहे. पोलीस कारवाई करीतच आहे. परंतु कोळसा चोरी मात्र अद्यापही बंद झाली नाही. त्या अगोदरही होत होत्या व आताही होतच आहेत. यात शासनाचे मात्र करोड रुपयाचे नुकसान होत आहे.
वेकोलीचे स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था आहे. जवळपास 300 च्या वर सुरक्षा रक्षक आहेत. इतकी मोठी सुरक्षा यंत्रणा असतांनाही चोरी होते तरी कशी? असा प्रश्न जनतेत उपस्थित केल्या जात आहे. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर वेकोली अधिकारी सहजासहजी फिर्यादी म्हणून हजर राहत नाहीत. त्यातच महत्वाचे म्हणजे चोरी होत असल्याची तक्रार वेकोली कर्मचारी का देत नाही ? कुणाच्या संगनमताने तर हे काम होत नाही ना? अशा अनेक प्रश्नांना वणीकर जनतेत पेव फुटले आहे. याला एका मंत्र्याचा आशीर्वाद असल्याची कुजबुज जनतेत सुरु आहे.