शिवसेनेत तिकीटाच्या दावेदारीसाठी चढाओढ, कुणाचा दावा प्रभावी?

नांदेकर, देरकर व निखाडे यांच्यात तिकीटासाठी रस्सीखेच

निकेश जिलठे, वणी: निवडणूक जवळ येताच सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवार तिकिटच्या फिल्डिंगला लागले आहेत. सध्या वणी विधानसभा क्षेत्र महाविकास आघाडीत काँग्रेस की शिवसेनेला (उबाठा) जाणार याची जोरदार चर्चा सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच पूर्वीपासून वणी विधानसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे तिकीट काँग्रेसलाच जाणार असा दावा काँग्रेसतर्फे केला जात आहे. तर जिल्ह्यातील एक जागा शिवसेनाला सुटणार व ती जागा वणी विधानसभा असणार असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. सध्या शिवसेनेत तिकीटासाठी इच्छुकांची चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. याचाच आढावा आपण आज घेणार आहोत.

शिवसेनेत सध्या सर्वच नेते रेसमध्ये आहे. मात्र यात माजी आमदार विश्वास नांदेकर, अडीच वर्षांआधी शिवसेनेत दाखल झालेल संजय देरकर व एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळख असलेले संजय निखाडे यांचे नाव आघाडीवर आहे. प्रत्येकाचे काहीतरी प्लस पॉइंट आहेत. त्यामुळे या तीन इच्छुकांपैकी कुणाचे पारडे जड राहणार याची सध्या विधानसभा क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगत आहे.

विधानसभेत सर्वात ज्येष्ठ विश्वास नांदेकर
विश्वास नांदेकर हे वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे सध्याचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. ते जिल्हा प्रमुख देखील आहे. त्यामुळे तिकीटावर पहिला दावा त्यांचा सांगितला जात आहे. 2004 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या विजयाला ब्रेक देत ही जागा सेनेकडे खेचून आणली. मात्र त्यानंतर त्यांना सलग दोन वेळा पराभवाला सामोरं जावं लागलं. 2009 साली त्यांना मतविभाजनाचा फटका बसला व 10 हजारांनी त्यांचा पराभव झाला. तर 2014 मध्ये त्याचा अवघ्या साडे पाच हजार मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला. मात्र 2019 च्या निवडणुकीत त्यांना अपक्ष असताना 15 हजार मत मिळाले होते. एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचे नाव सध्या आघाडीवर आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

संजय देरकर, सतत पराभव पण दावेदारी मजबूत
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले संजय देरकर हे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख आहेत. सध्या त्यांचे 200 युनिट मोफत वीज बिलासाठी जनसंपर्क अभियान सुरु आहे. याआधी ते चार वेळा ते विधानसभा निवडणुकीत उभे राहिले होते. मात्र 4 ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 2014 च्या निवडणुकीत ते 16 टक्के मत घेत चौथ्या क्रमांकावर होते. तर 2019 च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून 25 हजारांपेक्षा अधिक मत घेतले. सध्या त्यांची दावेदारीही मजबूत मानली जात आहे. मात्र सातत्याने पक्ष बदलणे व दर वेळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर अॅक्टिव्ह होण्याचा आरोप त्यांच्यावर पक्षातूनच होत आहे.

नवीन पर्याय संजय निखाडे
एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. 2012 पासून ते शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख आहेत. ते शिंदोला गावाचे सरपंचही होते. 2012 पासून सलग दोन वेळा ते पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले आहेत. यातील 2017 च्या निवडणुकीत ते भाजपची लाट असतानाही निवडून आले होते. संपूर्ण वर्षभर त्यांचे सामाजिक उपक्रम सुरु असते. सध्या स्थानिक पातळीवर गटबाजीचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जात आहे. या गटबाजीत तिसरा आणि नवीन पर्याय म्हणून त्यांच्या उमेदवारीचा दावा देखील मजबूत मानला जात आहे.

सध्या तिकीटाची लढाई ही विश्वास नांदेकर व संजय देरकर या दोन दिग्गजांमध्ये मानली जात आहे. यातील विश्वास नांदेकर यांना सलग तीन वेळा तर संजय देरकर यांना चार वेळा पराभव पत्करावा लागला होता. हे दोन्ही उमेदवार तुल्यबळ मानले जात आहे. हे दोन्ही उमेदवार वरचढ ठरतात की गटबाजीला तिसरा पर्याय किंवा एक नवखा उमेदवार म्हणून संजय निखाडे यांचे नाव समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(तुम्हाला कोणता पर्याय सक्षम वाटतो, हे कमेन्ट मधून आपणही सांगू शकता.)

Comments are closed.