कायरच्या दारू दुकानाबाबत जिल्हाधिका-यांकडे तक्रार

माजी पंचायत समिती सदस्याची तक्रार

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कायर येथे नव्याने सुरू होत असलेल्या देशी दारू दुकानाला गावकऱ्यांनी विरोध केला आहे. यात सरपंच, सचिव, अनुमोदन यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी दारू दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. याबाबतची तक्रार आता माजी पंचायत समिती सदस्य गोपालसिंग किसनसिंग भाडोरिया यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याआधी गावक-यांनी याबाबत खासदार बाळू धानोरकर यांच्याकडेही तक्रार केली होती.

भाडोरिया यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की कायर येथील सरपंच नितीन दखणे, ग्रामविकास अधिकारी खैरे व ग्रामपंचायत सदस्य कल्पना उद्दे यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. कायर येथे 18 मार्च 2020 ला ग्रामसभा व 20 मार्च 2020 ला खास ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेत सर्व सदस्य उपस्थिती असल्याचे दाखविण्यात आले. परंतु या ग्रामसभेत प्रत्यक्षात कुणीच उपस्थित नव्हते. कल्पना उद्दे या महिला बचत गट चालवितात आणि स्वाक्षरी करणारे बहुतेक या बचत गटात आहेत. त्यांनी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे सांगून घरोघरी जाऊन स्वाक्षरी व अंगठे घेतले. व सर्व जण ग्रामसभेत उपस्थित असल्याचे दाखविले. असा आरोप तक्रारीत आहे.

देशी दारू दुकानाला नाहरकत देण्याचा अर्ज हा 10 मार्चचा आहे. ग्रामपंचायतीने ग्रामसभेची नोटीस ही 8 मार्च रोजी काढली असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ग्रामपंचायतिच्या हजेरी रजिस्टर मध्ये सही केली नसल्याचे प्रतिज्ञापत्र गावकऱ्यांनी लिहून दिले आहे. ग्रामसभा व महिला ग्रामसभा घेतांना त्याचे व्हिडीओ चित्रीकरण घेण्यात यावी असा शासनाचा आदेश आहे. परंतु या आदेशालाही केराची टोपली दाखविण्यात आली आहे.

सभेत उपस्थित असणाऱ्यांचे सही व अंगठे बनावट असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे कायर येथे अगोदर दोन देशी दारू व दोन बियर बार होते. परंतु कायर येथील लोकसंख्या रेकार्डवर 2730 असल्याने व शासनाचा आदेशानुसार ज्या ठिकाणी गावाची लोकसंख्या 3000 आहे अशाच ठिकाणी दारू दुकानाला परवानगी असल्याने ही दुकाने बंद झाली. त्यानंतर सरपंच व सचिव यांनी कोणत्या आधारावर या स्थलांतरित दारू दुकानास नाहरकत प्रमाणपत्र दिले हे न उलगडणारे कोडे आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.