कागदावर एक अन् प्रत्यक्षात भलताच करतोय काँक्रिट रस्ता!
निविदेत घोटाळा झाल्याचा दिलीप भोयर यांचा पत्रकार परिषदेत आरोप
विवेक तोटेवार, वणी: सध्या शहरात सिमेंट काँक्रिट रस्त्याचं काम सुरू आहे. मात्र याच्या निविदेत मोठा घोळ. शासनाच्या डोळ्यांत धूळफेक करीत करोडो रुपयांचे काम नियम व अटींना धाब्यावर बसवून केले जात आहे. असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे दिलीप भोयर यांनी केला आहे. या दोषींवर गुन्हे दाखल करून चौकशी करण्याची तक्रार वणी पोलिसात देण्यात आली. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याकरिता पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिलीप भोयर यांनी दिली.
शहरातील चिखलगाव रेल्वे गेट ते वरोरा रेल्वे गेट रा. म. 315मध्ये सिमेंट चौपदरी रस्ता, नाली बांधकाम व पथदिवे बसविणे ह्या कामाची ब -2 निविदा सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडाकडून मिळविण्यासाठी मे. जे. पी. एंटरप्राईजेस मुबई यांनी निविदेतील बंधनकारक असलेल्या अटी व शर्तींनुसार प्रत्यक्ष कामाच्या मोक्याच्या 25 किलोमिटर परिघीय अंतरात स्वमालकीचा 60 घनमीटर प्रती तास क्षमतेच्या आर.एम. सी. प्लांटसह चिलींग प्लांट, सॅण्ड वॉश प्लांट, ट्रांजिट मिक्सर, पेव्हर, इत्यादी स्वमालकीची असल्याबाबतचा पुरावा कागदोपत्री सादर करून निविदा मिळवली. परंतु निवीदेमध्ये ही स्वामालकीची यंत्र सामग्री वापरून प्रत्यक्ष कामावर नमूद केलेल्या अंतरावरून स्वमालकीच्याच प्लांटवरून सिमेंट काँक्रिट आणून स्वतःच्या पदरी नेमणूक केलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांव्दारा काम करणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे.
जे.पी. एंटरप्राईजेस यांनी नियम व अटींचा भंग करून स्वतःचा प्लांट न उभारता ट्रायल अँड रनचा अहवाल सादर न करता कामास सुरवात केली. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांनी कुठल्या आधारावर संबंधित कंत्राटदाराला यांना काम करण्याची मुभा दिली हा आश्चर्याचा विषय आहे. कामामध्ये संजय ऑटोमोबाईल जवळ रस्त्याचा पृष्ठ भाग उखडून खड्डे पडले आहेत. तसेच साई दरबारजवळील लेनच्या पूर्ण लांबीमध्ये रस्त्याला जागोजागी तडे गेलेले आहेत. हे काम मागील दोन वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. ह्यावर बांधकाम विभागाचा कुठलाही अंकुश दिसून येत नाही. तसेच कामावर सरकारी अभियंते कधीच निदर्शनास येत नाहीत. ह्या सर्व प्रकारांमुळे जनतेची असुविधा निर्माण होऊन वारंवार किरकोळ अपघात होत असतात. असंही भोयर यांनी प्रतिपादन केलं.
ह्या विषयी वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी वारंवार तक्रारी करून खात्यास माहिती दिली. शेवटी माहितीच्या अधिकारांतर्गत कागदपत्र मिळाल्यावरून हा घोटाळा निदर्शनास आला आहे. तसेच कार्यकारी अभियंता यांनी कामाचा दर्जा निकृष्ट असतानासुद्धा ह्या कामांची 8 चालू देयके संबधित कंत्राटदारास अदा केली आहेत. ज्या अर्थी 25 किमी परिघीय अंतराच्या आत प्लांट उभारून एक महिन्याच्या आत ट्रायल अँड रन अहवाल सादर झालेला नसताना करारनामा रद्द का केला नाही. डोळेझाक करून, संगनमत करून, शासनाची फसवणूक केली आहे. असे प्राप्त माहितीच्या आधारावरच वणी पोलिसकडे रीतसर गुन्हे नोंदवून उचित कारवाईकरिता लेखी तक्रार भोयर यांनी दिली.
परंतु स्थानिक पोलिस प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे अखेर पोलिस अधीक्षक यांच्याकडे उचित कारवाई व चौकशीकरिता तक्रार दाखल केली. पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून काय कारवाई केली जाते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात अनेक नेत्यांनी आपले हात ओले केले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत यावेळी वंचितचे दिलीप भोयर, जिल्हा महासचिव मिलिंद पाटील, तालुका उपाध्यक्ष नरेंद्र लोणारे, शारदा मेश्राम, प्रणिता काळे, विशाल कांबळे , सोनू धुर्वे, वसीम शेख व पत्रकार उपस्थित होते.
Comments are closed.