ईद-ए-मिलाद निमित्त वणीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

5 सप्टेंबर रोजी मोमिनपुरा येथून भव्य मिरवणूक (जुलूस)

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर जयंतीनिमित्त वणीतील ईद मिलाद शहर कमिटीच्या वतीने यंदा 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत मौलाना मुफ्ती जुबेर रजा, मौलाना नजीर, मौलाना मुहीब रजा कादरी, जुनैद रजा अजहरी आणि मौलाना हसनैन आरिफी यांचे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर धार्मिक प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. तसेच रक्तदान शिबिर, हिजामा शिबिर (दोन दिवस), लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा, महिलांसाठी धार्मिक प्रवचन, जामा मस्जीदतर्फे गरजूंना 100 ब्लॅंकेटचे वाटप, ग्रामीण रुग्णालयात फळांचे वाटप आणि इतर उपक्रम राबवले जातील.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ईदनिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी पार पाडले जातात. शहरातील मुख्य मार्गावर स्वागत कमान उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 5 सप्टेंबर रोजी मोमिनपुरा येथून मिरवणूक (जुलूस) काढण्यात येणार असून, त्यात मोमिनपुरा, पंचशीलनगर, काजीपुरा, लालपुलिया, जामा मस्जीद, शास्त्रीनगर, इस्लामपुरा, रजानगर आणि दीपक चौपाटी येथील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतील.

ही मिरवणूक मोमिनपुरा दर्गा येथे महाप्रसादाने संपन्न होईल. इस्लामच्या शिकवणीनुसार जुलूसदरम्यान सर्वत्र सुख-शांती नांदावी आणि मानवाला त्रासांपासून मुक्तता मिळावी, यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. यंदा जुलूससह शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे प्रसिद्धी प्रमुख नईम अजीज यांनी दिली. या कार्यक्रमाची सध्या जोमात तयारी सुरु आहे. 

Comments are closed.