काँग्रेसतर्फे बदलापूर व कोलकाता घटनेचा निषेध
डॉ. महेंद्र लोढा व संध्या बोबडे यांच्या नेतृत्त्वात निवेदन
बहुगुणी डेस्क, वणी: बदलापूर येथील चिमुकलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. त्याआधी कोलकाता येथील एका महिला डॉक्टर व उत्तराखंड येथील एका नर्सवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचा काँग्रेसतर्फे निवेदन देत निषेध करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना तात्काळ फाशीची मागणी केली. बुधवारी दिनांक 21 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्त्वात शहर काँग्रेस तर्फे व महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संध्या बोबडे यांच्या नेतृत्त्वात महिला काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले.
24 ऑगस्ट रोजी बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंद मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे. निवेदनातून यापुढे महिला व विद्यार्थीनींवर कोणतेही अत्याचार होऊ नयेत, त्यांना सुरक्षीतता मिळावी, गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा तसेच या नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा असे मानून डॉक्टर आणि नर्स आपली रुग्णसेवा देतात. दिवस असो किंवा रात्र वैद्यकीय सेवा 24 तास सुरु असते. मात्र सध्या देशात महिला डॉक्टर किंवा नर्स यांच्याबाबत होणा-या हिंसाचा-याच्या घटना मन हेलावून टाकतात. पालक आपल्या मुलामुलींना शाळेत पाठवतात. मात्र तिथे देखील मुली सुरक्षीत नाहीत. अनेक शाळेत सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे पालकांनी मुलींना शाळेत पाठवावे कसे? असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देते वेळी वणी काँग्रेस शहरतर्फे ओम ठाकूर, तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, अशोक पांडे, जयसिंग गोहोकार, राकेश खुराणा, रवि कुंड्रावार, सुधीर खंडाळकर, बोबडे सर, रवी देठे, ऍड. रुपेश ठाकरे, तर महिला काँग्रेसतर्फे मंगला झिलपे, विजया आगबत्तलवार, अलका महाकुलकर, सविता रासेकर, दर्शना पाटील, जयवंत घोडाम, कल्पना मडावी, प्रिया मडावी, कमल पावडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments are closed.