जितेंद्र कोठारी, वणी : येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्र. 7 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सतत 3 तास वाचनाचा उपक्रम घेण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 3 तास विविध पुस्तकांचे वाचन करून या महामानवाला आदरांजली वाहिली.
उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर परिषद शाळा क्र. 7 च्या वतीने समाज माध्यमातून आवाहन करून विद्यार्थ्यांसाठी वाचनीय असलेल्या पुस्तकांचे दान मागितले होते. केवळ एक दिवसांपूर्वी केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राजाभाऊ पाथ्रडकर, विवेक देशपांडे, सुभाषराव देशमुख, अशोक बतरा, हरिहर भागवत, लक्ष्मण इड्डे इत्यादींनी त्यांच्या कडील 122 पुस्तके शाळेला दान देऊन या शाळेच्या ग्रंथालयाला समृद्ध करण्यासाठी हातभार लावला. डॉ. आबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगर वाचनालया कडून 150 बालकांसाठी वाचनीय पुस्तके या उपक्रमात विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली.
शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक वर्गानी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेबांना शाळेतील विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली अशी प्रतिक्रिया माजी विस्तार अधिकारी लक्ष्मण इड्डे यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला हारार्पणा केल्यानंतर दिगंबर ठाकरे व चंदू परेकर यांनी भीम गीत सादर केले. त्यानंतर राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून वाचनाचे महत्व समजावून सांगितले. या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी कल्पना मुंजेकर, चंदू परेकर, शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर, विजय चव्हाण, दिगांबर ठाकरे यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed.