शहरात दोन ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगवर लवकरच उड्डाणपूल

जितेंद्र कोठारी, वणी : यवतमाळ मार्गावर चिखलगाव रेल्वेगेटआणि वरोरामार्ग रेल्वे क्रॉसिंगवर लवकरच उड्डाणपुलाचे बांधकाम होणार आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारच्या सेतू बंधन योजने अंतर्गत या दोन्ही ठिकाणी ओव्हरब्रिज मंजूर करण्यात आले आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवार 15 एप्रिल रोजी नागपूर येथील महारेल मुख्यालयात ऑनलाईन पद्धतीने या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. 

यवतमाळ रोड, वरोरा रोड व नांदेपेरा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर दररोज तासंतास वाहतूक जामची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या रेल्वे क्रॉसिंगवर ओव्हर ब्रिज बांधकामाची मागील अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी होती. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी शहरातील 4 रेल्वे क्रॉसिंग तसेच झरीजामणी तालुक्यातील दिग्रस व सूर्दापुर रेल्वे गेटवर उड्डाणपुल बांधकामाची मंजुरी देण्याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. 

तब्बल 200 कोटीच्या निधीतून प्रस्तावित ओवरब्रिज बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच ऑनलाईन निविदा काढण्यात येणार आहे. उड्डाणपूल निर्मितीनंतर या मार्गावरील ये जा करणाऱ्या वाहन चालकांना व नागरिकांना ट्रॅफिक जाम पासून सुटका मिळणार आहे. 

Comments are closed.