एकाच्या शेतातील विहीर दुस-याच्या शेतात आणण्यासाठी वादग्रस्त मोजणी
भूमि अभिलेखचा आणखी एक कारनामा उघड, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार
भास्कर राऊत, मारेगाव: भूमीअभिलेख विभागाच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त होऊन एका शेतक-याने आत्महत्या केल्याचा आरोप होत असतानाच आता भूमी अभिलेखचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. एकाच्या शेतातील विहिर दुस-याच्या हद्दीत आणण्यासाठी भूमी अभिलेखच्या सर्वेअरने चक्क वादग्रस्त सर्वेक्षण केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत महसूल, भूमीअभिलेख, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून सर्वेअरवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, चोपण येथील यतीश मनोहर धोंगडे व संगीता मनोहर धोंगडे (अपाक-अल्पवयीन पालकत्व) यांची मार्डी शिवारात शेती आहे. सर्व्हे नंबर 33/1 मध्ये असलेली यांची 1 हेक्टर 31 आर इतकी शेती आहे. धोंगडे यांच्या शेताला लागून सुधाकर सदाशिव सूर्यवंशी (65) रा. वागदरा, ता. वणी यांची शेती आहे. सूर्यवंशी यांचा सर्व्हे नंबर 45 आहे व त्यांची शेती 2 हेक्टर 2 आर आहे. या दोघांनीही दुसऱ्याजवळून शेती खरेदी केलेली आहे.
जुन्या सर्व्हे नंबर 29 मध्ये एक विहीर खोदलेली आहे. ही विहीर सर्व्हे नंबर 45 चा मालक सूर्यवंशी यांच्या हद्दीत येत नाही. परंतु विहीर ताब्यात घेण्याच्या उद्देशाने सूर्यवंशी यांनी शेताची मोजणी दि. 13/2/2021 रोजी केली. यावेळी शेतमालकाने चुकीच्या खुणा व ताबा वहिवाट दाखवून दिशाभूल करीत बेकायदेशीर मोजणी करायला लावली.
मोजणी केल्यानंतर सूर्यवंशी यांची शेती 2 हेक्टर 2 आर होती, ती 2 हेक्टर 18 आर अशी दाखवण्यात आली. तशी मोजणी शिटवर नोंद सुद्धा करण्यात आली. त्यामुळे सूर्यवंशी यांनी सदर अतिक्रमित जागेवर सिमेंटचे पोल गाडून तारेचे कुंपनसुद्धा केलेले आहे. त्यामुळे धोंगडे यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांनी नुकसान करणाऱ्या सर्व्हेअरवर योग्य ती कारवाई करत गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे.
ज्यांनी या शेतीवर अतिक्रमण केलेले आहे ते काढण्यात यावे अशा प्रकारची तक्रार यतीश धोंगडे व संगीता धोंगडे यांनी महसूल, भूमिअभिलेख व जिल्हाधिकीर कार्यालयांना तक्रारीच्या प्रति पाठवून केली आहे.
हटवांजरी येथील शेतक-याचा चुकीच्या मोजणीमुळे मृत्यू ?
देवराव लटारी फरताडे यांनी 27 जुलै रोजी विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यांची प्रकल्पात जमीन गेली होती. त्यातून आलेल्या मोबदल्यातून त्यांनी हिवरा (मजरा) येथे तीन एकर शेत खरेदी केले होते. मात्र त्यांच्या शेतीची चुकीच्या पद्धतीने मोजणी शीट तयार करण्यात आली. असा मृत शेतक-याचा आरोप होता. मात्र ती समस्या काही सुटली नाही. चुकीच्या मोजणीमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असा आरोप मृतकाच्या पत्नीने केले आहे.
भूमी अभिलेखविरोधात तालुक्यात संताप
वारंवार भूमी अभिलेख विभागाचा भोंगळ कारभार पुढे येत आहे. कर्मचा-यांच्या वादग्रस्त कामामुळे एखाद्यावर जीव देण्याची वेळ येत आहे. त्यामुळे तालुक्यात भूमी अभिलेख विभागाबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शेती मोजणीमध्ये अशा प्रकारचे घोळ असल्याचे बोलले जात आहे. त्याची संपूर्ण चौकशी करून आणखी कुणावर आत्महत्या करण्याची वेळी येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून वादग्रस्त कर्मचा-यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
हे देखील वाचा: