‘कोरोना’ जनजागृतीबाबत नगरपालिका उदासीन

उपचार करणा-या डॉक्टरांची सुरक्षाही 'व्हेंटिलेटर'वर

0

जब्बार चीनी, वणी: कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. याबाबत सध्या देशभर जनजागृती मोहिम राबवली जात आहे. स्थानिक प्रशासनाला जनजागृती आणि योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. सध्या कोरोनामुळे वणी शहरातील सर्वसामान्य नागरिकही धास्तावले आहे. नगर परिषद प्रशासनाकडून नागरिकांत जनजागृती संदर्भात खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे. परंतु, पालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते.

शहरात झोपडपट्टीधारकांची संख्या अधिक असून, रोजमजुरीवर काम करणाऱ्या मजुरांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. शहरातील काही भागातील नागरिक तोंडाला मास्क, रुमाल लावून मार्गक्रमण करताना दिसत आहेत. चित्रपटगृहेही ओस पडली आहेत. गर्दीचे ठिकाण टाळण्याचे आवाहन शासनाकडून केले जात असल्याने नागरिकांकडून काळजी घेतली जात आहे.

घरात दूरदर्शन संच आहेत ते नागरिक विविध वाहिन्यांवर दाखविण्यात येणाऱ्या बातम्यांतून जागरूकता बाळगत आहे. मात्र काही लोकांकडे दूरदर्शन संच नाही अशा नागरिकांपयंर्त पालिकेच्या आरोग्य विभागाने पोहोचण्याची गरज आहे. मात्र पालिकेकडून स्वच्छतेसह जनजागृतीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

उपचार करणा-या डॉक्टरांची सुरक्षाही ‘व्हेंटिलेटर’वर
सध्या वणीत कोरोना बाधित रुग्ण आधळले नसले तरी खबरदारी म्हणून डॉक्टर आणि कर्मचा-यांना कोणतीही साधन सामुग्री पुरवण्यात आलेली नाही. यात गाऊन, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर, फवारणी पंप आणि औषधं इत्यादींचा समावेश आहे. यवतमाळमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने तो इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता नाकारता येत ऩाही. त्यामुळे उपचार करणा-या व्यक्तींबाबतही योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.