वणीत अल्पवयीन मुलं अमली पदार्थाच्या विळख्यात

नांदेपेरा रोड, वरोरा रोड व बायपास नशाखोरीचे ठिकाण

0

जितेंद्र कोठारी, वणी: “आजचे विध्यार्थी उद्याचे भविष्य” असे म्हटले जातात. मात्र खेळणे, बागडणे, मस्ती करण्याच्या लहानग्या वयातील शाळकरी मुलांना अमली पदार्थांचे आकर्षण जडणे आणि त्याचे सेवन करीत असल्यामुळे पालकवर्ग आणि शिक्षकांसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.

शालेय विध्यार्थी व्यसनाचे आहारी जाऊ नये म्हणून शासनाने शाळा परिसरातून 200 मीटरच्या अंतरावर तंबाकूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी लागू केली आहे. तसेच 18 वर्षाच्या खालील मुलांना बिडी, सिगारेट, तंबाकू, गुटखा, पान मसाला विकण्यास मनाही आहे. मात्र मागील काही काळापासून अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुटखा व धूम्रपान व्यसनासोबतच अमली पदार्थांचे सेवन व नशाखोरीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या वणी शहरात तेलंगणातून मोठ्या प्रमाणात गांजा या अमली पदार्थाची तस्करी होत असून अल्पवयीन शाळकरी मुलं गांजा तस्करांचे “सॉफ्ट टारगेट” बनले आहे. सायंकाळी नंतर शहरातील काही ठराविक पान टपऱ्याच्या मागे व खुल्या ले आउट मध्ये अल्पवयीन मुलांचे टोळके जमा होऊन गांजा भरलेल्या सिगारेटचे झुरके घेताना खुलेआम दिसत आहे. कोचिंग क्लासेसच्या नावावर तासंतास घराबाहेर असलेल्या मुलांच्या पालकांना पुसटशी कल्पना नसते की त्यांच्या पाल्य केव्हा व्यसनाच्या आहारी गेला आहे.

अमली पदार्थ बाळगणे व विक्री करणे कायद्याने गुन्हा असताना शहरातील शाळेय मुलांना ते सहज उपलब्ध होत आहे. शहरातील नांदेपेरा रोडवरील एका बियरबारच्या समोर असलेल्या पानठेल्याच्या मागे दर रोज 8 ते 10 अल्पवयीन मुलं दुचाकीने येऊन नशाखोरी करताना दिसत आहे. याच मार्गावर खुल्या लेआऊट मध्येसुद्दा रात्रीच्या अंधारात व्यसनाधीन मुलांचे टोळके मधप्राशन व अमली पदार्थांचे सेवन करताना आढळतात.शहरात वरोरा रोडवर महाविद्यालय तर नांदेपेरा मार्गावर दोन व वडगांव मार्गावर एक इंग्रजी माध्यम शाळा असून अमली पदार्थ विक्रेते महाविद्यालयातील व शालेय मुलांना आमिष दाखवून अमली पदार्थ सेवन करण्याची सवयी लावत असल्याचे बोलले जाते.

कमी वयात जास्त पैसे मिळत असल्यामुळे तसेच धकाधकीच्या जीवनात ताण घालवण्यासाठी व मौजमजेसाठी तरुणाई व्यसन करते. त्यामुळे तरुणाईचे भविष्य धोक्‍यात आले आहे. पालकांनादेखील आपली मुले काय करत आहेत हे माहीत नसणे खूप धोकादायक आहे. कुतूहल आणि जिज्ञासेतून असे कृत्य मुले करतात. बाराव्या वर्षांपासून शरीरात रासायनिक बदल होत असतात. मुलांवर पालकांनी किंवा शिक्षकांनी वेळीच लक्ष दिले पाहिजे. त्यांचे समुपदेशन केल्यास त्यांच्यातील कुतूहल नष्ट होईल. सिगारेट ही व्यसनाकडे वळण्याची पहिली पायरी आहे. ते जर चांगले वाटले किंवा आवडले तर अमली पदार्थाच्या सेवनाची सवय लागू शकते. पालकांनी घरातील मुलांची वागणूक, चिडचिड किंवा स्वभावात होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवावे.

गांजा तस्करांवर ठोस कारवाई नाही

माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी वणी पोलिसांनी एका किराणा दुकानातून गांजा जप्त केले होते. मात्र त्या नंतर पोलिसांनी गांजा तस्करांविरुद्द कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. वणी येथे रेल्वे मार्गाने तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजा पुरवठा होत असून तस्करीसाठी भिकाऱ्याचे वापर केले जात असल्याची चर्चा आहे. शहरात मादक पदार्थांच्या विक्री व सेवन करणाऱ्या विरुद्द प्रशासनाने व पालकांना लवकरच योग्य पाऊल उचलणे गरजे आहे अन्यथा येत्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होईल यात दुमत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.