विलास ताजने, वणी: कोरोना विषाणूमुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी शासनाच्या वतीने आपत्कालीन उपाययोजना केल्या जात आहे. त्याअनुषंगाने मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे नागरिकांची गर्दी ही कोरोनाच्या प्रसारास पोषक ठरते. त्यामुळे गर्दी होणाऱ्या कार्यक्रमावर निर्बंध घालण्यात आले आहे. याचा फटका माणसांच्या जन्ममृत्यूसारख्या आनंदी आणि दुःखद प्रसंगालाही बसतो आहे.
माणूस हा समाजशील प्राणी आहे. म्हणून मानवी जीवनात घडणाऱ्या काही प्रसंगाला विशेष महत्त्व पूर्वजांपासून दिलं गेलं आहे. म्हणून परिचित व्यक्तींच्या मरणी – तोरणी हजर राहण्याची एक परंपरा आजतागायत पाळली जात होती. मात्र कोरोनाच्या भयगंडात या परंपरेलाही फाटा बसला आहे.
मित्र, नातेवाईक, शेजारी किंवा ज्यांची संगत आपण आयुष्यभर केली. अशांच्या लग्न सोहळ्यात हजेरी लावून नववरवधूला शुभेच्छा देणें किंवा अंत्यसंस्काराच्या प्रसंगी न चुकता हजेरी लावून शेवटचा निरोप देणें, ही प्रत्येकांची मनस्वी ईच्छा असते. पूर्वी छोटा मोठा कोणताही कार्यक्रम असो गर्दी असायचीच. गर्दी शिवाय कार्यक्रमालाही शोभा नसायची. जणू काही गर्दीचे विक्रम मोडण्याची परंपरा सुरू झाली होती. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
मात्र मार्च महिन्यापासून कोरोना नियंत्रणासाठी शासनाने घातलेल्या अटींमुळे माणसांच्या बहुतांश चालीरिती बदललेल्या दिसून येत आहे. सध्या सुज्ञ नागरिक गर्दीच्या ठिकाणी येजा करणे टाळत आहे. लग्न असो किंवा अंत्यविधी केवळ मोजक्याच लोकांत पार पाडणे बंधनकारक झाले आहे. पूर्वी लग्न, अंत्यसंस्कार प्रसंगी अमाप गर्दी असायची. मात्र आता कोरोनाची बंधने आणि भीती यामुळे मोजकेच व्यक्ती उपस्थित राहत आहेत.
परिणामी मोक्षधामातही स्मशान शांतता बघायला मिळत आहे. गावखेड्यात असो की शहरात कमीतकमी लोकांच्या उपस्थितीत मृतकांवर अंत्यसंस्कार उरकले जात आहेत. श्रद्धांजलीपर कार्यक्रमालाही तिलांजली दिली जात आहे. दशक्रियाविधी, तेरवी सगेसोयरे घेऊन उरकले जात आहे. तेरवी, चौदावी निमित्ताने दिल्या जाणारी जेवणावळी प्रथा बंद झाली आहे.
कोरोनामुळे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा, रितीरिवाज यांच्यावर काही काळाकरिता का होईना पडदा पडला आहे. यात पैश्यांची उधळपट्टी होणाऱ्या परंपरा भविष्यात कायमस्वरूपी बंद झाल्यास सर्वांचाच फायदा आहे. एकूणच कोरोनाच्या भयगंडात मानवांची जीवनशैलीच पार बदलून गेलेली दिसून येत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)