जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा शंभरावर गेला असताना आता कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. आधी केवळ यवतमाळ पुरता मर्यादीत असलेल्या कोरोनाने जिल्ह्यातील पुसद, महागाव, दिग्रस, कळंब तालुक्यात पाय पसरल्याने आता जिल्हासह ग्रामीण भागातील नागरिकांचे टेन्शन एकदा पुन्हा वाढले आहे. सध्या वणी यापासून दूर आहे. मात्र उमरी येथील संशयीतांमुळे परिसरात खळबळ माजली होती. अखेर त्या दोन संशयीतांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने वणीकरांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र तरीही सावधान राहणे गरजेचे आहे.
गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील ऍक्टिव्ह कोरोना बधितांचा आकडा झपाट्याने कमी झाला होता. मात्र मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर व इतर राज्यातून हजारोच्या संख्येने विद्यार्थी व मजूर आपले घरी परतले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातसुद्दा कोरोनाचा शिरकाव होऊ लागला आहे.
वणी परिसरात लॉकडाउनमुळे अडकून पडले हजारों विद्यार्थी व मजुरांचे मागील एका आठवड्यापासून वणी उपविभागात आगमन झाले आहे. बाहेरून आलेले व्यक्तींना आरोग्य विभागाकडून तपासणी न करता त्यांच्या हातावर होम कवारन्टीनचे शिक्के मारण्यात आले आहे. त्यातच शासनाने लॉकडाउनमध्ये सूट दिल्यानंतर वणीतील बाजारपेठ गर्दीने फुलली आहे. मॉर्निंग वॉक व शतपावली करीता जाणाऱ्या लोकांनी मास्क व सोशल डिस्टनसिंगला बाजूला सारल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
राज्यात 31 मे पर्यंत लॉक डाउन व कलम 144 लागू असताना स्थानिक पोलीस व प्रशासनाने जणू नागरिकांना मनमर्जी करण्याची सूट दिली आहे. वणी विभागात आजपावेतो कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेलं नाही. परंतु बाहेरून येणारे विद्यार्थी, मजूर, ट्रक चालक यांच्यामुळे वणी व ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वणीकरांनो आता तर पूर्वीपेक्षा जास्त सावधानी बाळगा, नाही तर पुसद, महागाव, दिग्रस, कळंब प्रमाणे कोरोना पॉजिटिव्ह मिळाल्यास पुन्हा घरात लॉक व्हावे लागेल.
सध्या यवतमाळ येथे पुणे येथून आलेल्या व्यक्तिचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 17 झाली आहे. सदर व्यक्ती कळंब येथील असून सध्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये भरती आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये 17 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 22 जण आहे. यात सहा प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 113 वर गेली असून यापैकी 96 रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये 17 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण भरती आहेत.