निजामुद्दीनला गेलेल्या ‘त्या’ तिघांचा रिपोर्ट निगेटीव्ह, मात्र….
वणीकरांना दिलासा... मात्र अद्याप धोका टळलेला नाही
जब्बार चीनी, वणी: यवतमाळ येथे आयसोलेशन वार्डमध्ये रिपोर्टची वाट पाहत असलेल्या वणीतील निजामुद्दीन येथे गेलेल्या तिघांचे तसेच वणीतील आणखी एक व्यक्ती अशा चौघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र काल आयसोलेशन वार्डातील 8 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आल्याने वणीतील त्या चौघांचीही खबरदारी म्हणून पुन्हा चाचणी होणार आहे. आज त्यांच्या घशातील नमुने पुन्हा नागपूर येथे पाठवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या रिपोर्टला आणखी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागू शकतो. रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने वणीकरांनी जरी सुटकेचा श्वास सोडला असला तरी या चौघांना मात्र पूर्ण दिलासा मिळालेला नाही.
वणीतून यवतमाळ येथे आयसोलेशनमध्ये आतापर्यंत सहा व्यक्तींना पाठवण्यात आले होते. या सहा पैकी सहा व्यक्तींचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. याआधीच दोन व्यक्तींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता तसेच त्यांना आयसोलेशन वार्डातून सुटी देण्यात आली आहे. आता सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने अद्याप वणीत कोरोनाचा शिरकाव झाला नसल्याचे स्पष्ट झाल्याने वणी करांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
खबरदारी म्हणून पुनर्चाचणी
वणीतील या चौघाचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र काल यवतमाळ येथील 8 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून पुनर्चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. वणीतील चौघांना सध्या वेगळ्या आयसोलेशन वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. आज घरी जाण्याची अपेक्षा होती मात्र पुनर्चाचणी मुळे जाता आले नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली.