नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोना मुक्त झालेल्या मारेगाव शहरात आज पंचायत समितीतील एक कर्मचारी पोझिटिव्ह आल्याने शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. सदर कर्मचारी हे गेल्या चार दिवसांपूर्वी यवतमाळ येथे कामा निमित्त गेले होते. मारेगाव येथे परत आल्यावर प्रकृती खराब झाली होती. आज त्यांची वणी येथील कोविड सेंटरमध्ये रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पोझिटिव्ह आला आहे.
पंचायत समितीमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याचे कळताच शहरातील प्रभाग क्र. 5 माधव नगरी मधील पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरांपासून 200 मीटर परिसर सील करण्यात आला आहे. पॉजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 21 लोकांना ट्रेस करण्यात आले असून त्यांचा स्वॅब घेऊन त्यांना कॉरन्टाईन करण्यात आले आहे.
काल झालेल्या आढावा बैठकीत कर्मचा-याची उपस्थिती
विशेष म्हणजे काल पंचायत समितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्याधिकारी सह विविध अधिकारी आले होते. त्या वेळी सदर कोरोना पॉजिटिव्ह कर्मचारी सुद्धा हजर होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या महिन्यात तालुक्यातील कुंभा येथील एक व्यक्ती राजुर (कॉ) येथील एका महिला रुग्णांच्या थेट संपर्कात आल्याने त्या व्यक्तीचा सुध्दा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ती व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना सुटी देखील मिळाली होती. तेव्हा पासून तालुक्याने सुटकेचा श्वास घेतला होता. तालुक्यातील जनजीवन सुरळीत चालू असताना आज पुन्हा पंचायत समिती मधील एक कर्मचारी पॉजिटिव्ह आल्याने शहरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.