जितेंद्र कोठारी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील गुरुनगर येथील 1 रुग्ण तर मारेगाव तालु्क्यातील 1 रुग्ण वणी येथे पॉजिटिव्ह आढळून आला आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 52 झाले आहेत. दरम्यान कोरोनासाठी सुरु असलेल्या सर्वे पथकातील एका शिक्षकाला कोरोना झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत शिक्षकांनी आपली आपबिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्याने पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा बोजवारा उडाल्याचे समोर आले असून यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
गुरुवारी दिनांक 18 मार्च रोजी 249 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 2 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 247 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 104 व्यक्तींचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आज यवतमाळ हून एकही रिपोर्ट प्राप्त झाले नाही तर अद्याप यवतमाळहून 608 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात 52 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 22 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 19 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 11 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1327 रुग्ण आढळून आलेत. यातील 1249 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
सोशल मीडियातून पालिका प्रशासनाचे वाभाडे
सध्या नगर पालिकेचे शिक्षक कोरोनाविषयक कामाचे सर्वेक्षण करीत आहे. यात दूध विक्रेते, भाजी विक्रेते, गॅस वितरक, पाणी वितरक, न्यूजपेपर वितरक इत्यादींना नोटीस बजावणे. विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणे इत्यादी कामे या शिक्षकांकडे आहे. मात्र या पथकातील एक शिक्षकच पॉजिटिव्ह आला आहे. सर्वे पथकातील शिक्षकांना पालिका प्रशासनातर्फे आवश्यक ते साहित्य पुरवण्यात न आल्याचा आरोप शिक्षकांकडून केला जात आहे. याबाबत सोशल मीडियात शिक्षकांनी आपली आपबिती मांडली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या कामाचे जाहिररित्या वाभाडे निघाले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना वेगळा न्याय आणि नगर पालिकेच्या शिक्षकांना वेगळा न्याय का दिला जातो असा सवाल देखील शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
हे देखील वाचा: