कोरोनाबाधित मृतकांवर अंत्यसंस्कार करणारे 3 कोरोना योद्धा पॉजिटिव्ह

गरज भासली तर बाहेर येऊन सेवा देऊ: कोरोना योद्धा

0

विवेक तोटेवार, वणी: खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा। झटू सर्वभावें करू स्वर्ग गावा। अशीच निष्काम ग्रामसेवा ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित होती. त्यांनी वारंवार सेवेचे महत्त्व सांगितलं आहे. प्रत्येक क्षेत्रात सेवा करणारे हात झटत आहे, लढत आहे. सीमेवर लढणारा सैनिक असो किंवा या महामारीच्या काळात प्राणाची बाजी लावून रुग्णांची सेवा करणारे कोरोना योद्धा असोत. आज हे देवदूत बनले आहेत. मात्र सेवा करता करता आज वणीतील 3 कोरोना योद्धा हेच पॉजिटिव्ह आले आहेत. हे सर्व सेवानगर येथील रहिवाशी असून ते सध्या परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये आयसोलेट आहेत. कोरोना रुग्णांच्या सेवेसह कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर ते अंत्यसंस्कार करायचे. पॉजिटिव्ह आले तरी अजून ही त्यांची सेवेची निष्ठा ढळलेली नाही. गरज भासली तर बाहेर येऊन सेवा देऊ असा विश्वास त्यांनी ‘वणी बहुगुणी’जवळ व्यक्त केला.

कोरोनाची इतकी दहशत आहे की अनेकदा मृतकांचे नातेवाईकही त्यांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार देतात. अशा वेळी त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे काम स्वच्छता दूत करतात. आज पॉजिटिव्ह आलेले हे तीनही कोरोना योद्धा हे स्वच्छतादूत आहेत. त्यांची सहा जणांची टीम आहे. या कोरोना योद्ध्यानी आतापर्यंत आतापर्यंत वणीतील तीन ते चार जणांचे अंतीम संस्कार केले आहे.

दहा बार दिवसांआधी वणीतील एका व्यक्तीचा सेवाग्राम येथे मृत्यू झाला होता. त्या व्यक्तींचे त्यांनी वणीत अंत्यसंस्कार केले होते. त्यानंतर 2-3 दिवसांनी त्यांना कोरोनाचे लक्षणं जाणवू लागले. त्यातील दोघांना दोन दिवसांआधी परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. आज त्यांचा यवतमाळ हून रिपोर्ट आला. यात ते दोघे पॉजिटिव्ह आले.

दोन कोरोना योद्धा पॉजिटिव्ह आल्याने त्यांच्या इतर सहका-यांची आज रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. त्यात त्यांचा तिसरा साथीही पॉजिटिव्ह आला आहे. सध्या या तिघांवरही परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. मात्र पॉजिटिव्ह आले तरी अजून ही त्यांची सेवेची निष्ठा ढळलेली नाही.

बाहेर येऊन सेवा देण्यास तयार – कोरोना योद्धे
आम्ही सर्व खबरदारी घेऊन कार्य करीत होतो. मात्र सध्या काळ असा आहे की, की कुठून संसर्ग होईल हे सांगता येत नाही. लोकांच्या सदिच्छांचे बळ आमच्या पाठीशी आहेच. याही परिस्थितीत आम्ही बाहेर येऊन सेवा देण्यासही तयार आहोत. काम झाल्यावर आम्ही पुन्हा आयसोलेट होऊ. केवळ प्रशासनाने आमची गरज आहे, असा आदेश द्यावा. कोणतीही सेवा देण्यास आम्ही तत्पर आहोत. आम्ही तिघे जरी सध्या उपचार घेत असलो, तरी आमचे तीन साथी बाहेर सेवा देत आहेत. त्यामुळे वणीकरांना चिंता करण्याची तशी गरज नाही. आम्ही सर्व बरे असून काळजी करण्यासारखे काहीही नाही. यातून लवकरच बरे होऊन आम्ही पुन्हा कामाला लागू
– पॉजिटिव्ह आलेले कोरोना योद्धा

पॉजिटिव्ह आलेत तरीही मानवाची सेवा हीच ईश्वरसेवा ते मानतात. मानवतेच्या या महानकार्याचे ते अविभाज्य घटक आहेत. ही सेवा त्यांना आत्मिक समाधान देते. ते पॉजिटिव्ह निघालेत. तरीही त्यांना हा सेवेचा वारसा आणि लढा निरंतर सुरूच ठेवायचा आहे. त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला सलाम.

Leave A Reply

Your email address will not be published.