खरीप पेरणीच्या तोंडावर कापूस विकण्याची लगबग

पावसाळ्याची चाहूल लागूनही कापूस घरातच, शेतकरी संकटात

0

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापूस खरेदीवर परिणाम झाला आहे. महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर कापूस खरेदी सुरु झाली. मात्र कासवगतीने होत असलेल्या कापूस खरेदीमुळे वणी उपविभागातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. विक्रीअभावी अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरी पडून आहे.

खरीप पेरणी तोंडावर आली आहे. पण शेतकऱ्यांचा कापूस विकला जात नसल्याने पेरणीसाठी बी बियाणं आणि खतं कशी आणायची, हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सरकारी कापूस खरेदी संथगतीनं सुरु असल्यानं शेतकरी संकटात सापडले आहे. एकट्या वणी तालुक्यात 6 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यातूनच 4 हजार शेतकरी अजून कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत आहे.

सीसीआयकडे मनुष्यबळ नसल्यानं वणी केंद्रावर रोज 100 ते सव्वाशे गाड्या कापसाची खरेदी होते. याच कासवगतीने सरकारी कापूस खरेदी सुरु राहिली, तर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी महिना लागू शकतो. त्यामुळे कापूस खरेदीची गती वाढवा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. कापूस खरेदी वेळेत झाली नाही तर अनेक शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.