शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास दलालीचा परवाना होईल रद्द

बाजार समितीच्या काट्यानुसार कापसाला मिळणार भाव

0
Sagar Katpis

सुशील ओझा,झरी:- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावरच शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या गाडीचे वजनकाटा करूनच जिनिगमध्ये खाली करावे. समितीच्या काट्यालाच ग्राह्य धरून भाव दिला जाणार असा निर्णय बाजार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास दलालीचा परवाना रद्द होणार असल्याचेही कळवले आहे.

दसऱ्यानिमित्त 25 ऑक्टोबरपासून बालाजी जिनिंगमध्ये कापसाच्या खाजगी खरेदीचा मुहूर्त आहे. याच अनुषंगाने 24 ऑक्टोबरला दुपारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैठक झाली. बैठकीत दलाल, व्यापारी व इतर समस्या बाबत चर्चा करण्यात आली.

सभापती संदीप बुरेवार व संचालक, व्यापारी, दलाल यांच्या चर्चेत शेतकऱ्यांच्या कापसाची गाडी बाजार समितीच्या यार्डमध्ये वजनकाटा केल्याशिवाय जिनिग मध्ये खाली केली जाणार नाही. तसेच जिनिंगमध्ये कोणत्याही दलालांनी थेट कापसाची गाडी नेऊन खाली केल्यास किंवा शेतकऱ्यांची लूट झाल्यास त्या दलालचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करणार असल्याचे सभापती संदीप बुरेवार यांनी बैठकीत ठणकावून सांगितले.

वजनकाट्याचा एकही रूपया खर्च शेतकऱ्यांना लागणार नाही. मोफत वजनकाटा बाजार समितीमध्ये करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनीसुद्धा बाजारसमिती, व्यापारी व दलाल लोकांना वजनकाटा करण्यास मदत करावी असेही आवाहन करण्यात आले.

बैठकीत वणी येथील मामराज व मंजीत या जिनिंगमध्ये असलेले रेट देण्यात येणार आहे. कापसाचा रेट सकाळी ९ वाजता बाजार समितीत काढण्यात येणार. कापसाची गाडी बाजार समितीमध्ये वजनकाटा केल्याशिवाय जिनिंगमध्ये तोलाई केली जाणार नाही.

कापसाची खाजगी खरेदी हंगामाच्या शेवटपर्यंत सुरू ठेवावी. बाजार समिती व दलाल यांच्या भागिदारीने शेतकऱ्यांकरिता 5 रुपये वाहनाप्रमाणे शिवभोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सकाळी 7 वाजेपासून वजनमाप करून देण्यात येणार. मार्केट व जिनिंगमधील फरक 10 किलोपर्यंतची सूट देण्यात आली.

मार्केटच्या कमिटी वजनाप्रमाणे शेतकऱ्यांना पेमेंट दिले जाणार आहे. तीन जिनिंग सुरू झाल्यानंतर हर्रास पद्धत सुरू करण्यात येईल. अडत एक महिन्यानंतर देणे अशा प्रकारच्या सूचना व नियम सर्वानुमते ठरविण्यात आलेत. शेतकऱ्यांच्या हिताकरिता तसेच शेतकऱ्यांची लूट व्यापारी किंवा दलालांमार्फत होऊ नये याकरिता हे नियम लावण्यात आलेत.

जिल्यातील ही पहिलीच बाजार समिती आहे, की जी मार्केटच्या वजनकाट्याप्रमाणे भाव देणार आहे. सभापती संदीप बुरेवार, सचिव रमेश येल्टीवार, उपसभापती संदीप विचू, संचालक सुनील ढाले, राजीव आस्वले, बापूराव जिंनावार यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे. बैठकीत माजी सभापती अनिल पावडे, खाजगी बाजार समिती अध्यक्ष नवनीत चिंतलवार, व्यापारी ओम ठाकूर, महेंद्र आबड, दलाल व मापारी उपस्थित होते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!