निकेश जिलठे, वणी: माय लेकराचं नातं जगातलं सर्वात मजबूत नातं. दोघंही क्षणभर एकमेकांना नजरेआड होऊ देत नाहीत. मग तो कोणताही जीव का असेना. मात्र कधीकधी काहीतरी विपरीत घडतं. दोघांची ताटातूट होते. दोघांच्याही काळजांना जीवघेण्या वेदना सुरू होतात. नेमकं असंच झालं शहरात. चोरट्यांनी गाय चोरून नेल्याने दोन दिवसांपासून नुकतंच जन्मलेल्या वासराचा सारखा त्याच्या आईसाठी हंबरडा सुरू आहे.
स्थानिक मोमिनपुरा येथील रहिवासी असलेले शिक्षक अभय मधुकरराव पारखी (42) शेतकरी आणि पशुपालकदेखील आहेत. साईनगरीलगत त्यांची शेती आहे. त्यांचे घर आणि शेती लागूनच आहे. त्यांच्याकडे पांढऱ्या-फिक्कट लाल रंगाची पाच वर्षांची लक्ष्मी नावाची गाय होती. मागील पंधरवड्यात लक्ष्मीनं एका कालवडीला जन्म दिला. सगळं काही नीट आणि सुरळीत सुरू होतं.
मंगळवारी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास लक्ष्मी गाय सकाळी नेहमीप्रमाणे घराला लागलेल्या शेतात चरण्यासाठी गेली. मात्र रात्री उशिरापर्यंत ती परत आलीच नाही. संध्याकाळी आपली आई घरी येईल या आशेनं कालवड तिची वाट पाहत बसला. तरीही गाय आलीच नाही. मुकं जनावर ते. तेव्हापासून 20 दिवसांच्या वासराचा आईसाठी सारखा हंबरडा सुरू आहे. सातत्यानं वासराच्या हंबरडा ऐकून अभय पारखीचंदेखील काळीज पाझरलं. यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी मिसिंग कम्प्लेंट नोंदवली आहे.
गाय चोरीची शक्यता
पारखी यांचं घर आणि शेती यामध्ये केवळ एक फाटक आहे. घर आणि शेती लागूनच असल्यानं गेल्या चार वर्षांपासून गाय नेहमी स्वत:च शेतात जाते. ठरल्यावेळी संध्याकाळी घरी परत येते. मात्र यावेळी ती परत आलीच नाही. 20 दिवसांच्या वासराला एकटं सोडून गाय शक्यतो बाहेर राहत नाही. त्यामुळे तस्करांनी गाय चोरून नेल्याचा संशय पारखी यांना आला. याआधीही त्यांची 2 जनावरे चोरीला गेलीत. त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. यावेळी मात्र त्यांना वासराच्या जीवाचा कोलाहल पाहवला नाही. लगेच त्यांनी याबाबत तक्रार दिली. याआधी त्यांच्या शेजा-याचेदेखील जनावर चोरीला गेल्याची माहिती आहे.
गाय परत करण्याचं आवाहन
गाय नसल्यामुळं कालवड कासावीस झाली आहे. ही भावनिक बाब समजून घेण्याची विनंती पारखी यांनी केली आहे. गाय परत करणा-याला किंवा त्याची माहिती देणा-याला आर्थिक बक्षीस ही त्यांनी जाहीर केलं आहे. तसंच दिलेली तक्रार परत घेण्याची ग्वाहीदेखील दिली.
Comments are closed.