भालर रोडवर ट्रॅक्टर पलटी, चालकाचा जागीच मृत्यू

एकाच दिवशी परिसरात 3 वाहने पलटी, दोघांचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: भालर रोडवरील जीएस ऑईल मिलजवळ एक भरधाव ट्रॅक्टर पलटी झाला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. शाम शेषराव उत्तरवार (55) असे मृत चालकाचे नाव आहे. आज दुपारी 1.30 ते 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ट्रॅक्टरचालक हा सचिन मुत्यलवार यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. बुधवारी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी तो सिमेंटचे पोल आणण्यासाठी जात होता. दरम्यान जीएस ऑईल मिल जवळील हनुमान मंदिरा जवळ चालकाचे ट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाच्या अंगावर पडले. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. दुचाकी किंवा जनावराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याचे बोलले जात आहे. आज वणीत वाहन पलटी झाल्याच्या तीन घटना घडल्या. यात दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला.

Comments are closed.