ब्रेकिंग न्यूज : प्रा. महादेव खाडे यांच्यावर वणी पो.स्टे. येथे फौजदारी गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : येथील केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व संचालक प्रा. महादेवराव खाडे यांच्यावर वणी पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशव नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक नंदकिशोर दिकुंडवार यांनी सोमवार 21 ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व संचालक प्रा. महादेवराव खाडे यांनी दिनांक 2 जुलै 2023 रोजी वणी येथील विश्रागृहात पत्रकार परिषद घेऊन केशव नागरी पतसंस्थेमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक नंदकिशोर दिकुंडवार यांच्यावर आर्थिक लूट केल्याचा आरोप केला. प्रा. खाडे यांनी या संदर्भात पुरावा म्हणून गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी, नांदेड या संस्थेचे दीपक दिकुंडवार यांच्या नावाचे संगणीकृत इंटरेस्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स प्रत पत्रकारांना दिली. 

प्रा. महादेव खाडे यांनी केलेल्या आरोपाबाबत पत्रकारांनी केशव नागरी पतसंस्थेच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. तेव्हा महादेव खाडे यांनी पत्रकारांना उपलब्ध करून दिलेले इंटरेस्ट सर्टिफिकेट व्हाइटनरच्या साहाय्याने खोडतोड करून केशव नागरी पतसंस्था या नावाच्या ठिकाणी दिकुंडवार मि.दीपक नंदकिशोर केल्याचे निदर्शनास आले. तसेच इंटरेस्ट सर्टिफिकेट निर्गमित करणाऱ्या शाखेचे नावावर व बँकेच्या शिक्यावर सुद्धा वाईटनर लावून खोडतोड केल्याचे दिसून आले.

प्रा. महादेव खाडे यांनी सूडबुद्धीने संस्थेच्या व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहचविण्याच्या उद्देशाने केलेल्या कृत्याचा विरोधात सोमवार 21 ऑगस्ट रोजी केशव नागरी पतसंस्थेतर्फे सीईओ दीपक दिकुंडवार, (42) रा. छोरीया ले आऊट, गणेशपुर यांनी वणी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. तक्रारीवरून वणी पोलिसांनी गैरअर्जदार महादेव गोविंदराव खाडे (72), रा. प्रगतीनगर वणी यांच्यावर खोटे कागदपत्र तयार करणे, बदनामी करणे, अब्रू नुकसानी करण्याच्या भादवि कलम 468, 469, 471, 500 आणि 501 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार पोनि अजित जाधव यांचे मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल प्रभाकर कांबळे करीत आहे.

Comments are closed.