सावित्रीबाईंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दत्तक-पालक समिती कार्यरत – ना. हंसराज अहिर

जितेंद्र कोठारी, वणी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे, सक्षम झाली पाहिजे. यासाठी त्यांनी जे स्वप्न पाहिले, त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सावित्रीबाई फुले दत्तक- पालक समिती मागील 22 वर्षांपासून अविरत कार्यरत आहे. या परिसरातील मुली शैक्षणिक साहित्याच्या अभावी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी कार्य करीत आहे. असे गौरवोद्गार केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष ना. हंसराज अहिर यांनी व्यक्त केले. ते सावित्रीबाई फुले दत्तक- पालक उपक्रम समितीच्या माध्यमातून शैक्षणिक दृष्टया दत्तक घेण्यात आलेल्या मुलींना साहित्य वितरण प्रसंगी साहित्य वितरक म्हणून बोलत होते.

या उपक्रमाअंतर्गत नगर परिषदेततील 69 मुली, पंचायत समिती वणीतील 205 मुली, पंचायत समिती मारेगाव मधील 44 मुली, दामिनी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 17 मुली अशा एकूण 351 मुलींना समाज सहभागातून शैक्षणिक दृष्टीने दत्तक घेऊन वर्षभर पुरेल एवढे साहित्याचे वाटप अतिथींच्या हस्ते करण्यात आले. या मुलींना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था र. न. 109 , अजय पिंपळशेंडे सिंगापूर, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, सहायक आयुक्त अमरावती श्यामकांत मस्के, राजेश गोहणे वेकोली वणी, उपविभागीय अधिकारी कारंजा ललीतकुमार वऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी वणी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार वणी निखिल धुळधर, पोलीस निरीक्षक बीड मुकुंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक नागपूर वैभव जाधव, डॉ. संचिता नगराळे, नायब तहसीलदार विवेक पांडे यांनी या उपक्रमात मुलींना दत्तक घेऊन मोठे सहकार्य केले आहे. 

कार्यक्रमाची सुरुवात नगर परिषद शाळा क्र.7 च्या विद्यार्थिनी अदिती झाडे, मैथिली अवताडे, नव्या शिखरे, लावण्या फाळके, जान्हवी क्षीरसागर यांनी गायलेल्या स्वागत गीताने झाली. या प्रसंगी अतिथींनी हा उपक्रम समाज हिताचा असून सातत्याने सुरू राहावा. समाजातील मागास मुलींना याचा लाभ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती वणीचे माजी सभापती संजय पिंपळशेंडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून वणी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, ठाणेदार अजित जाधव, दिनकर पावडे व आयोजन समितीचे अध्यक्ष किशनलाल खुंगर हे उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सदस्य लक्ष्मण इड्डे, सूत्रसंचालन सचिव गजानन कासावार यांनी व आभार जयप्रकाश सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत फेरवाणी, हरेंद्र चौधरी, अशोक चटप यांनी मोलाचे सहकार्य केले.

Comments are closed.