शेअर मार्केटच्या नावाखाली शिक्षकाला 14 लाखांचा गंडा

ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हेगारांचा नवा फंडा

विवेक तोटेवार, वणी: आजच्या हायटेक जमान्यात फसवणूक कशी होईल सांगता येत नाही. कुणाचातरी कॉल येतो. अत्यंत नम्र आणि इम्प्रेस करणाऱ्या भाषेत तो एखादी ऑफर ठेवतो. मग संमोहित झाल्यासारखे आपण त्याच्या सूचनांचे पालन करायला लागतो. मग नंतर कळतं की, आपली आर्थिक फसवणूक झाली आहे. त्यामुळे कुणाचाही अशाच ऑफर किंवा स्कीम साठी फोन आला, तर फोन करणारा ‘तो’ किंवा ‘ती’ कोण आहे? हे जाणून घेतलं पाहिजे. आणि स्वतःची फसवणूक टाळली पाहिजे.

अशीच एक घटना वणीतील गुलमोहर पार्क येथे घडली. तिथे राहणाऱ्या एका शिक्षकाला 50 टक्के रकमेत शेअर घेऊन देण्याचे आमिष एकाने दाखवले. आणि 13 लाख 67 हजार रूपयांनी गंडविले. शिक्षकाच्या तक्रारीवरून वणी पोलिसात तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तक्रारीनुसार फिर्यादी किशोर ओंकारराव चौधरी (44) यांना 18 फेब्रुवारी रोजी एका फोन आला. त्यांना एका कंपनीचे शेअर हे 50 टक्के डिस्काउंटने घेऊन देण्याबाबत सांगितले. याकरिता त्यांना अन्थेंटिक कंपनीचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. किशोर यांनी या अॅपमध्ये टप्प्याटप्प्यांनी 13 लाख 67 हजार रूपये जमा केलेत. नंतर बघितल्यावर त्यांच्या अकाऊंटवर 44 लाख 65 हजार पाचशे 74 रुपये जमा असल्याचे दिसत होते.

त्यानंतर आरोपी महिलेने त्यांना एका कंपनीचे शेअर्स घेण्याचे सांगितले. परंतु पैसे नसल्याने त्यांनी शेअर्स घेऊ शकत नसल्याचे सांगितले. पैसे न भरल्यास आपल्या अकाउंटवर असलेली रक्कम आपणास मिळणार असल्याचा दिलासा दिला. तुमच्या खात्यात असलेल्या पैशांच्या किंमतीत सदर शेअर्स मिळत असल्याचे सांगितले. 5 मार्च रोजी त्यांना 59 लाख 65 हजार रूपयांचे शेअर्स घेतल्याचे दिसले.

याबाबत त्यांनी आरोपी महिलेला विचारणा केली. त्या महिलेने किशोर यांना घाबरून जाण्याचे काही कारण नसल्याचे सांगितले. त्यानंतर 6 मार्च रोजी फिर्यादीला उर्वरित 15 लाख रूपये भरण्यास सांगितले. पैसे न भरल्यास आपणास शेअर्स मार्केटमधून ब्लॅक लिस्ट करणार असल्याचे सांगितले. किशोर यांना सर्व घटनाक्रम संशयास्पद वाटला. त्यानंतर 6 मार्च रोजी किशोर यांनी 1930 या क्रमांकावर सायबर क्राइम झाल्याची तक्रार केली.

त्यानंतर त्या महिलेने सांगितले की, आपणास शेअर्स मिळाले आहेत. परंतु आपल्याला पैसे काढण्याकरिता अगोदर 15 लाख रूपये भरावे लागतील. अशाप्रकारे 18 फेब्रुवारी ते 6 मार्च या दरम्यान आरोपी महिला, अनिलकुमार गोयल व कस्टमर एकझुकेटीव्ह यांच्याविरुद्ध कलम 318 (4) BNS, सहकलम 66 (D) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पोउपनि अश्विनी रायबोले करीत आहेत.

Comments are closed.