विवेक तोटेवार, वणी: वणीत पारंपरिक पद्धतीने व जल्लोषात दसरा साजरा करण्यात आला. जैत्रा मैदानावर संध्याकाळी 6.30 वाजता रावणदहन करण्यात आले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर सोनेरूपी आपट्याची पाने एकमेकांना देत, नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.
वणीत पंजाब सेवा संघ व पंजाब नवयुवक मंडळाद्वारे दरवर्षी रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी हे 52 वं वर्ष होतं. सायंकाळी वणीत राम, लक्ष्मण, हनुमान यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. श्री राम मंदिर खाती चौकातून निघालेली ही मिरवणूक जटाशंकर चौक, आंबेडकर चौक, टागोर चौक, तुटी कमान, गाडगे बाबा चौक, काठेड ऑइल मिल पासून वाजत गाजत जत्रा मैदानात पोहोचली.
या ठिकाणी रावणाचा प्रतिकात्मक पुतळा उभा करण्यात आला होता. राम, लक्ष्मण, हनुमाण बनलेल्या मुलांनी अग्नी बाणाचा वर्षाव करत रावणाच्या पुतळ्याचे दहन केले. संपूर्ण परिसर यावेळी ‘जय श्रीराम’च्या जयघोषात दणाणून गेला. बच्चे कंपनीने आपल्या पालकांसह हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती.
दहन झाल्यानंतर रथ मिरवणूक तलाव रोडने भारत माता चौक, तुटी कमान, गांधी चौकातून जात पुढे याची सांगता श्री राम मंदिरात झाली. या कार्यक्रमात रामाची भूमिका विक्रांत चचडा, लक्ष्मण मोनिश खत्री तर हनुमान मोनिश मदन यांनी वठवली. तर रावणाची निर्मिती ही नागपूर येथील बिनवार यांनी केली.
दरम्यान दस-यानिमित्त घटस्थापनेपासून वणीतील राम मंदिरात 9 दिवस राम कथा वाचन सुरू होते. तर दसऱ्याच्या निमित्त संपूर्ण बाजारपेठा फुलल्या होत्या. बाजारात फुल, हार व फळांची विक्री मोठ्या जोमात होती. आपले वाहन स्वच्छ करण्यासाठी वणीतील सर्व गॅरेजमध्ये वाहनचालकांची गर्दी जमली होती. तर दस-याचा मुहुर्त पाहून अनेकांनी नवीन गाड्यांची खरेदी केली. लोकांनी घरोघरी शस्त्र स्वच्छ करून पूजा केली.
वणीचे ग्रामदैवत दैवत जैताई माता देवस्थानात भाविकांनी एकाच गर्दी केली होती. दसऱ्याच्या निमित्ताने सोन्याच्या दुकानातही सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी पहावयास मिळाली.
लिंकवर क्लिक करून पाहा रावण दहणाचा व्हिडीओ…