शेतात बांध टाकून पाणी अडविल्यामुळे पिकांचे नुकसान

गणेशपूर येथील शेतकऱ्याची आमदारांविरुद्ध तक्रार

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या विरोधात गणेशपूर येथील शेतक-याने तक्रार दाखल केली आहे. आमदारांनी आपल्या शेतात मातीचा बांध टाकला आहे. बांधामुळे शेजारील शेतात पाणी साचले आहे. परिणामी उभ्या पिकांचे नुकसान झाले, अशी तक्रार शेतकरी संदीप विधाते यांनी केली आहे.

तक्रारीनुसार, संदीप यांचे वडील गणेशपूर येथील शेतकरी शंकर बापूराव विधाते यांची मौजा धाबापूर (उ), गाव नंबर 164, गट क्र. 74 येथे 1.04 हे.आर. येथे वडिलोपार्जित शेत जमीन आहे. शेताच्या शेजारीच पूर्व दिशेला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे शेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विधाते यांच्या शेतातील पावसाचे पाणी आमदाराच्या शेताच्या एका बाजूने वाहून समोरील नाल्यात जात होते. मात्र या उन्हाळ्यात आमदार बोदकुरवार यांनी आपल्या व विधाते यांच्या शेतादरम्यान मातीचा बांध टाकला. त्यामुळे विधाते यांच्या शेतात पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे.

त्यांनी शेतात कपाशी या पिकाची लागवड केली आहे. मात्र शेतात पाणी साचल्याने उभ्या पिकांचं नुकसान होत आहे. शेतीसाठी दोन लाख रुपये पीक कर्ज काढले आहे. मात्र पिकांचे नुकसान होत असल्याने वडिलांची मानसिक स्थिती बिघडली आहे. शेतात पाणी साचल्याबाबत आमदाराशी भेटून पाणी काढण्याबाबत चर्चा केली. मात्र त्यांनी माझ्या शेतातून पाणी निघू देणार नाही असे ठणकावून सांगितल्याचा आरोप विधाते यांनी तक्रारीत केला आहे.

प्रशासनाने लवकरच शेतात साचलेल्या पाण्याची समस्येचा कायमस्वरूपी निपटारा करावा, अन्यथा माझे वडिलांचे काही कमी जास्त झाल्यास प्रशासन व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे जबाबदार राहतील असा इशारा विधाते यांनी तक्रारीतून दिला आहे.

पाण्यामुळे माझ्या शेतीचे नुकसान – आ. बोदकुरवार
मागील 5-6 वर्षांपासून सदर शेती ठेक्याने देत असल्यामुळे मी शेताकडे जाऊन बघितले नाही. या वर्षी शेतात जाऊन पाहणी केली असता विधाते यांच्या शेतातून वाहणाऱ्या पाण्यामुळे माझ्या शेतातील जमीन खरडून गेल्याचे लक्षात आले. मी माझ्या मालकीच्या शेताच्या सिमेअंतर्गत मातीचे बांध काढले आहे. शेतकरी विधाते यांनी स्वतःच्या शेतात नाली खोदून पाणी काढल्यास पाणी साचून राहणार नाही.
: संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार वणी विधानसभा

Leave A Reply

Your email address will not be published.