पावसामुळे बोटोणी परिसरात सोयाबिन, कपाशीचे मोठे नुकसान

परिसरात मध्यरात्री बरसला मुसळधार पाऊस

सुरेश पाचभाई, बोटोणी: परिसरात काल मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. रात्री झालेल्या पावसाचा मोठा फटका सोयाबिन आणि कपाशी या पिकांना बसला आहे. अनेक शेतक-यांच्या सोयाबिन काढलेल्या गंजी पावसामुळे ओल्या झाल्या आहेत. आधीच अतीवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतक-यांचे कालच्या पावसाने आणखीनच नुकसान केले आहे.

या वर्षी संपूर्ण मारेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी परतीच्या पावसाने कहर केला. यात शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तब्बल 20 दिवसांनंतर दिनांक 15 सप्टेंबर शुक्रवारच्या मध्यरात्री पुन्हा बोटोणी परिसरात मुसळधार पाऊस झाला. रात्री 1:30 वाजता पासून पावसाला सुरूवात झाली. सकाळी 10 वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.

सध्या सोयाबिन काढण्याचा आणि कापूस वेचण्याचा सिजन सुरू आहे. पावसामुळे सोयाबिन आणि कापूस ओला झाला. सोयाबिनला कोंब फुटण्याची भीती यामुळे व्यक्त होत आहे. तर पावसामुळे कपाशीचे बोंडं खाली पडले आहे. पावसामुळे सोयाबिन आणि कापूस या दोन्ही उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक  शेतक-यांच्या सोयाबिन काढलेल्या गंजी शेतात ठेऊन होत्या. पावसामुळे त्या ओल्या होऊन त्यामुळेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

मुसळधार पावसामुळे पांदण रस्त्यावर असे पाणी साचले होते.

परिसरात मजुरांची टंचाई
सध्या परिसरात शेतातील कापूस वेचण्यासाठी व सोयाबिन काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने पिक काढण्याचे काम काही प्रमाणात थंडावले आहे. अनेक अल्पभूधारक शेतकरी दुस-यांच्या शेतात काम करत असल्याने सध्या ते त्यांच्याच शेतात काम करीत आहे. काही ठिकाणी परप्रांतिय मजूर आले आहेत. मात्र तरीही शेतमजुरांची टंचाई आहे. शेतमजुरांअभावी पीक काढण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे हाती आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात रात्री आलेल्या पावसाने नुकसान केले आहे.

हे देखील वाचा:

तहसील कार्यालयासमोरील दुकानाला लागली भीषण आग

मातोश्री ट्रेडर्सची 3 वर्षांची यशस्वी घोडदौड पूर्ण

50 एकरची सोलर झटका मशिन अवघ्या 8490 रुपयांमध्ये

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.