गुलाब वादळाने उसाला झोपविले, शेतक-याचे नुकसान

हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकरी हवालदिल

भास्कर राऊत, मारेगाव: हातातोंडाशी आलेले महागडे ऊसाचे पीक नुकत्याच झालेल्या गुलाब वादळाने आडवे केले. शेतकऱ्याचे जीने असलेले पिकच डोळ्यासमोर आडवे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने आता आपण आपले कुटुंब कसे चालवायचे अशा विवंचनेत शेतकरी पडले आहे. शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी संबंधीत शेतकऱ्याने केली आहे.

मारेगाव तालुक्यात कपाशी, तूर, सोयाबीन ही पारंपरिक पिके आहेत. त्यानंतर रब्बी हंगामामध्ये चणा आणि गहू अशी पिके घेतात. परिसरातील शेतकरीही याच पिकांवर समाधान मानत आपली उपजीविका करीत असतात. पण तालुक्यातील सगनापूर येथील एक ध्येयवेडा तरुण आपल्या शेतामध्ये वेगळा प्रयोग करायचा प्रयत्न करतो. पण… निसर्गही त्याला साथ देत नसल्याचाच प्रत्यय तालुक्यामध्ये आल्याचे दिसून येते.

सगनापूर येथील गौरव मुरलीधर ढुमणे हा एक युवा शेतकरी. यांच्याकडे एकूण 5 एकर शेती आहेत. त्यापैकी त्यांनी दिड एकर शेतीवर उसाची लागवड केली. काहीतरी वेगळे करून आपले शेतीचे उत्पन्न वाढविणे यासाठी त्यांनी वणी तालुक्यातील रासा येथून उसाचे बेणे आणले. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर वेगळा प्रयोग करून उसाची यशस्वी शेती करू असा ध्यास मनी धरलेल्या गौरव यांनी खासगी कर्ज काढले. आणि यथायोग्य उसाची लागवड केली.

वेळेवर खतपाणी दिले. पीक जोमाने उभे राहिले. आता आपल्याला चांगले भरघोस उत्पादन मिळेल या आशेवर तो होता. मात्र गौरव यांच्या आशा गुलाब वादळाने पार धुळीस मिळविल्या. चांगले डौलात उभे असलेले उसाचे पीक गुलाब वादळाने आडवे केले. आणि शेतकऱ्याच्या दुःखाला पारावार उरला नाही.

उसाचे पीक पूर्णपणे उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून उसाच्या पिकासाठी केलेला अमाप खर्च यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलल्या जात आहेत. उसासाठी केलेला लाखोंचा खर्च पाण्यात गेलेला पाहून शेतकरी ढाय मोकलून रडत आहेत. शासनातर्फे तलाठी आणि कृषिसेवक यांनी पिकाचा पंचनामा केलेला असून शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

हे देखील वाचा:

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या वणीत

मतदानाला 12 गेले… 12 च परत आले… पण मत मिळाले 11: वारे नगरपालिकेचे भाग 5

Comments are closed.