पुलाअभावी मूर्ति ग्रामस्थांना पावसाळ्यात भोगाव्या लागतात यातना

जीव धोक्यात घालून काढावी लागते वाट

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शेवटच्या टोकावर पैनगंगा नदी किनाऱ्यावर वसलेले छोटसं गाव मूर्ति… गावची लोकसंख्या 250 च्या घरात… ढाकोरी गावाकडून वाहत येणारा ओढा मूर्ति गावाशेजारून पावसाळ्यात ओसंडून वाहत पुढे पैनगंगेला मिळतो… पैनगंगा नदीला पूर आला की ओढ्याचा प्रवाह थांबतो… मग सुरू होतो गावकऱ्यांच्या जीवन मरणाचा संघर्ष…नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगाने ग्रामस्थांची चांगलीच धावपळ उडाली…

वणी तालुक्यातील मूर्ति हे गाव पैनगंगेच्या नदी किनाऱ्यावर वसलेले आहे. मूर्ति, बोरी आणि देऊरवाडा या तीन गावांमिळून गट ग्रामपंचायत आहे. गावाशेजारून वाहणाऱ्या ओढ्याला अतिवृष्टीमुळे नुकताच पूर आला होता. नेमकी याच दिवशी स्थानिक जगन्नाथ बाबा मंदिरात वास्तव्यास असलेले मारोती पारखी महाराज यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे महाराजांना उपचारासाठी नेताना खाटेवर बसवून वाट काढावी लागली.

अशा वेळी दुर्दैवाने दुर्घटना घडण्याची शक्यता असते. मात्र, नाईलाजाने ग्रामस्थांना पावसाच्या दिवसात मरणयातना सोसाव्या लागत आहे. ओढ्यावर पाईप टाकून रपटा बांधलेला आहे. परंतु रपट्याची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी वाहत असते. परिणामी पावसाळ्यात ग्रामस्थांना प्रचंड हाल सोसावे लागतात.

पुलाची उंची वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली. मात्र, मागणीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. सदर ओढ्यावर उंच पूल बांधण्याच्या मागणीसाठी बोरीचे सरपंच योगीराज आत्राम, ढाकोरीचे सरपंच अजय कवरासे सतत पाठपुरावा करीत आहेत. लोकप्रतिनिधींनी सदर बाबीची दखल घेण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

हे देखील वाचा:

मतदानाला 12 गेले… 12 च परत आले… पण मत मिळाले 11: वारे नगरपालिकेचे भाग 5

दणका: अखेर शिरपूर ठाणेदाराची रवानगी नियंत्रण कक्षात

Comments are closed.