मतदानाला 12 गेले… 12 च परत आले… पण मत मिळाले 11: वारे नगरपालिकेचे भाग 5

....तर वेकोलिचे जीएम ऑफिस असते वणीत

जब्बार चीनी, वणी: दिनांक: 26 जून 1997… वेळ: दुपारी… स्थळ: वणी नगरपालिकेचे सभागृह…. नगराध्यक्षपदासाठी त्या दिवशी निवडणूक होती. दोन्ही गट आपापल्या सदस्यांना सोबत घेऊन मतदानासाठी आले. विरोधी पक्षनेते आनंदात होते. कारण यावेळी जादुई आकडा असलेले 12 मेंबर त्यांच्या सोबत होते. तर सत्ताधारी पक्षाकडे 11 मेंबर होते. विरोधी पक्षाचे 12 मेंबर हसत खेळत वर सभागृहात मतदानासाठी गेले. मतदान करून खालीही 12 मेंबर सोबतच परत आले. मात्र निकाल वेगळाच लागला. 11 सदस्य असलेल्या गटाचा नगराध्यक्ष झाला. तर बहुमतात असलेले सदस्य पडले. यावेळी विरोधी पक्षाचे एक मत फुटले होते. विशेष म्हणजे फुटलेला उमेदवारही त्यावेळी विरोधी गटाच्या सोबतच होता. पुढे काही महिनेही ‘ती’ व्यक्ती कोण होती हे त्या गटालाही कळले नव्हते.

बहुमताचे संख्याबळ सोबत असूनही निवडणूक हरलेले ते दुर्दैवी उमेदवार होते ओमप्रकाश चचडा तर विजयी उमेदवार होते स्व. सतीशबाबू तोटावार. तर फुटलेले उमेदवार होते… ते पु्न्हा कधीतरी…. हा किस्सा नगरपालिकेच्या इतिहासातील सर्वाच चर्चीत किस्यांपैकी एक मानला जातो. केवळ हीच या पंचवार्षीक मधली महत्त्वाची घटना नव्हती; तर तत्कालीन नगराध्यक्ष अरुण पटेल यांनी वेकोलिचे जीएम ऑफिस वणीत येण्यासाठी अनेकांनी विरोध केल्याने तसेच यासाठी गटातच विरोध झाल्याने हतबल होऊन राजीनामा दिला. आजच्या ‘वारे नगरपालिकेचे’ या मालिकेच्या 5 व्या भागात आपण नगराध्यक्ष पदाच्या या दोन निवडणुकीचा आढावा घेणार आहोत.

1996 मध्ये वार्डाची पूनर्रचना झाली. 35 वार्डांचे 23 वार्ड झाले. या निवडणुकीत 222 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत काँग्रेसचेच दोन गट आमनेसामने होते. यावेळी विजूभाऊ मुकेवार, अरुण पटेल यांची शहर विकास आघाडी तर वामनराव कासावार, ओमप्रकाश चचडा, मंगल चिंडालिया यांची जनशक्ती आघाडी हे दोन पॅनल आमनेसामने होते. याशिवाय भाजप, शिवसेना, रिपाई इत्यादी पक्ष  ही होते.

10 डिसेंबर 1996 रोजी नगरपालिकेची निवडणूक झाली. निकाल लागला. या निवडणुकीत शहरविकास आघाडी व जनशक्ती आघाडीला प्रत्येकी 4 जागा मिळाल्या. शिवसेनेला 1, आरपीआयला 1 तर 13 अपक्ष उमेदवार निवडून आलेत. त्यामुळे नगराध्यक्ष कोण होणार यासाठी अपक्षांचे मत महत्त्वाचे ठरणार होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.

नगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर 21 डिसेंबरला नगराध्यक्ष पदाची निवडणूक होती. त्यावेळी मुकेवार गटाचे संजय देरकर यांचा नगरसेवकाच्या निवडणुकीत पराभव झाल्याने अरुण पटेल यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी समोर आले. नगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यात अरुण पटेल यांना 12 तर कासावार गटाचे सतीशबाबू तोटावार यांना 9 मते मिळाली, दोन मते अवैध ठरले. अरुण पटेल हे वणी नगरपालिकेचे 27 वे नगराध्यक्ष झाले. मात्र त्यांचा कार्यकाळ अवघ्या 7 महिन्याचाच होता. 17 जून 1997 ला त्यांनी राजीनामा दिला.

….तर वेकोलिचे जीएम ऑफिस असते वणीत
अरुण पटेल यांच्या कार्यकाळात सर्वाधिक गाजलेला मुद्दा म्हणजे वेकोलिच्या जीएम ऑफसचा. वणीत वेकोलिचे जीएम ऑफीस व्हावे यासाठी वेकोलिही आग्रही होती. याबाबत पटेल त्यांनी प्रस्ताव मांडला. वेकोलि सारख्या कंपनीचे जीएम ऑफिस वणीत आल्यास वणी शहराच्या दृष्टीने तो एक मानाचा तुरा ठरेल, ऑफिस, कॉलनी झाल्यास परिसराचे वैभव वाढेल, लोकांना रोजगार मिळेल आणि विशेष म्हणजे या जागेतून नगरपालिकेला मोठा महसूल मिळेल, अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी जत्रा मैदान जवळील 50 एकर जागा प्रस्तावित होती. एकीकडे तांत्रिकबाबींची पूर्तता करणे तर दुसरीकडे नगरसेवकांचे समर्थन अशा दोन्ही बाजू त्यांना सांभाळायच्या होत्या.

तत्कालीन नगराध्यक्ष अरुण पटेल यांनी जसा जीएम ऑफिसबाबत प्रस्ताव मांडला. त्याबाबत त्यांच्याच गटात दोन गट पडले. अनेकांनी वेकोलिच्या जीएम ऑफिसला विरोध केला. याशिवाय इतर मुद्यावरही गटांतर्गत धुसफुस वाढत होती. जीएम ऑफिसबाबत मुकेवार यांच्या घरी बैठक घेण्यात आली. मात्र त्यावेळी त्यांच्याच गटाचे 5 नगरसेवक गैरहजर राहिले. विरोधी पक्षाचा तर याला विरोध होताच, शिवाय ओमप्रकाश चचडा यांनी पटेल यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी फिल्डिंग देखील लावली होती. त्यांनी मुकेवार-पटेल यांच्या गटातील पटेल यांच्या विरोधात गेलेल्या काही नगरसेवकांना हाताशी धरण्यास सुरूवात केली. एक वेळ अशी आली की अरुण पटेल यांच्या लक्षात आले की विरोधी गटाची मदत घेतल्याशिवाय जीएम ऑफिस वणीत येणे अशक्य आहे.

पटेल यांनी एक आश्चर्यकारक निर्णय घेतला. त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ज्यांना पराभूत केले होते, ते विरोधी पक्षाचे उमेदवार स्व. सतिशबाबू तोटावार यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर नगराध्यक्षपदाचा सशर्त प्रस्ताव ठेवला. जर जीएम ऑफिसला तुमच्या गटाचे समर्थन असेल, तर मी राजीनामा देतो व तुम्ही नगराध्यक्ष बना असा प्रस्ताव त्यांनी ठेवला. तोटावार यांनी त्यांची अट मान्य केली. अखेर अरुण पटेल यांनी 17 जून 1997 रोजी राजीनामा दिला. विशेष म्हणजे सतीशबाबू तोटावार यांना नगराध्यक्ष करण्यासाठी कट्टर विरोधक असलेले मुकेवार गट आणि कासावार गट यावेळी एकत्र आले.

अरुण पटेल व स्व. सतीशबाबू तोटावार

दुसरीकडे आधीपासूनच नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव टाकून पायउतार करण्यासाठी सज्ज असलेले ओमप्रकाश चचडा यांच्यासमोर आता त्यांच्याच गटातीलच सतीशबाबू तोटावार यांचे आव्हान उभे झाले. त्यांनी पुन्हा नगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावणे सुरू केले. मुकेवार-कासावार गटातील काहींना आपल्याकडे ओढण्यात ते यशस्वी झाले. आता त्यांच्या गटात तब्बल 12 सदस्य गोळा झाले. हा बहुमताचा जादुई आकडा होता. तर सतीशबाबू तोटावार यांच्याकडे फक्त 11 सदस्य होते. 

मतदानास 12 गेले, 12 च परत आले, पण मत भेटले 11
अखेर 26 जून 1997 ला दुपारी दोन्ही गट आपापल्या सदस्यांना सोबत घेऊन मतदानासाठी आले. यावेळी बहुमत ओमप्रकाश चचडा यांच्या बाजूने होतं. ते शंभर टक्के नगराध्यक्ष बनणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी घरी बँड, हारतूर, मिठाई इत्यादी संपूर्ण तयारी करण्यात आली होती. मतदानासाठी सभागृहात 23 ही उमेदवार आले. विरोधी पक्षाचे 12 मेंबर आनंदाने वर सभागृहात मतदानासाठी गेले. मतदान करून 12 मेंबरच खाली परत आले. मात्र निकाल जाहीर झाला तेव्हा 11 सदस्य सोबत घेऊन गेलेले कासावार-मुकेवार गटाचे सतीश बाबू तोटावार हे विजयी झाले. तर 12 सदस्य घेऊन मतदानास गेलेले ओमप्रकाश चचडा यांचा पराभव झाला. त्यांच्या गटातील एक सदस्य फुटल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला होता. विशेष म्हणजे हा फुटलेला सदस्य कोण होता हे पुढे अनेक महिने त्या गटाला माहिती देखील नव्हते. 

यावेळीही ओमप्रकाश चचडा ठरले दुर्दैवी
1994 च्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ओमप्रकाश चचडा यांनी आवश्यक ते 18 उमेदवार गोळा केले होते. आता विजयी होणार म्हणून ते नगरसेवकांना घेऊन देवदर्शन/पर्यटनाला गेले. मात्र ऐनवेळी संजय देरकर यांनी गट बदलवला व संजय देरकर हे नगरध्यक्ष झाले. ओमप्रकाश चचडा यांचे स्वप्न थोडक्यात भंगले. त्यांना अवघ्या 3 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. तर 1997 च्या निवडणुकीच्या वेळी पुरेसे संख्याबळ असतानाही ऐन मतदानाच्या वेळी एक उमेदवार फुटल्याने त्यांच्या तोंडचा घास हिसकवला गेला. त्यांना अवघ्या एका मताने पराभव स्वीकारावा लागला व त्यांचे पुन्हा एकदा स्वप्न थोडक्यात भंगले. वणी नगरपालिकेच्या इतिहासातील ते सर्वात दुर्दैवी उमेदवार असावे.

दिग्गजांना पत्करावा लागला पराभव
1996 च्या निवडणुकीची विशेषता म्हणजे या निवडणूक दिग्गज उमेदवारांना पराभव पत्कारावा लागला. यात सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे तत्कालीन नगराध्यक्ष संजय देरकर. संजय देरकर हे वार्ड क्रमांक 1 मधून उभे होते. त्यांचा स्व. सतीशबाबू तोटावार यांनी पराभव केला. वार्ड क्रमांक 8 मध्ये नगरपालिकेचे उपाध्यक्ष पारस कोठारी हे चक्क तिस-या क्रमांकावर होते. दुस-या क्रमांकावर बाबा कुल्दीवार होते. या वार्डातून सुरेश खिवंसरा हे विजयी झाले. वार्ड क्रमांक 2 मधून पीके टोंगे यांचा नरेंद्र भंडारी यांनी पराभव केला. वार्ड क्रमांक 18 मध्ये मंगल चिंडालिया यांचा प्रकाश देशपांडे यांनी पराभव केला. वार्ड क्रमांक 17 मध्ये डॉ. अशोक नालमवार यांचा ओमप्रकाश चचडा यांनी पराभव केला.

वणीतील नेत्यांची, लोकप्रतिनिधींची राजकीय इच्छाशक्ती पडली कमी
आधी वेकोलि वणी क्षेत्राचे जीएम ऑफिस ताडाळी येथे शिफ्ट झाले. त्यानंतर 1997 मध्ये वणी नॉर्थच्या जीएम ऑफिससाठी वणीत प्रयत्न झाले. मात्र ते प्रयत्न अयशस्वी ठरले. त्या काळी जर वणीतील सर्व नेते, लोकप्रतिनिधी वणीसाठी एकवटले असते तर कदाचित वेकोलि वणी नॉर्थचे जीएम ऑफिस वणीत राहिले असते. याद्वारे सुमारे 15 लाखांपेक्षा अधिकचा महसूल नगरपालिके मिळणार होता. पुढे वेकोलिचे जीएम ऑफिस भालर येथे झाले. ही संपूर्ण वसाहतच वणी येथे उभी राहिली असती तर आपसुकच शहरात रोजगार वाढला असता. मिळणा-या महसुलातून वणीच्या विकासासाठी हातभार झाला असता. त्याकाळी जर वणीतील सर्व पुढारी, नेते, नगरसेवक वणीसाठी एकवटले असते तर वणीच्या वैभवात नक्कीच भर पडली असती.  

जाता जाता- अरुण पटेल यांनी पत्रकार परिषदेत जीएम ऑफिसचे कारण देऊन राजीनामा दिला असला तरी बरेच राजकीय अभ्यासक राजीनाम्यासाठी केवळ हे एकच कारण असल्याचे मानत नाही. अंतर्गत गटबाजी, अविश्वास ठरावासाठीची फिल्डिंग इ गोष्टी देखील कारणीभूत असल्याचे अनेक लोक मानतात. मात्र त्यावेळी सर्वसामान्य लोकांनीही या मुद्यासाठी जोर लावला नाही, हे देखील तेवढेच खरे होते व तो मुद्दा केवळ राजकीय उरला. 

क्रमश:

(पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुकीचे विविध किस्से, रंजक राजकीय घडामोडी आणि डावपेच घेऊन भेटू पुढील भागात.  वारे नगर पालिकेचे ही सिरीज वाचण्यास विसरू नका…)

आपण जर वारे नगरपालिकेचे या सिरिजचा चौथा भाग वाचला नसल्यास खालील लिंकवर क्लिक करून वाचता येईल.:

ऍक्सिडेंटल नगराध्यक्ष… संजय देरकर…

वणी बहुगुणीच्या सर्व अपडेट साठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज तसेच गृप जॉईन करा…

पेज लिंक – https://www.facebook.com/wanibahuguni/

गृप लिंक – https://www.facebook.com/groups/241871233000964/

 

Comments are closed.