अवकाळी पावसाचा तुरीला मोठा फटका, शेतक-यांचे नुकसान

बोटोणी परिसरात तुरीच्या पेंढ्यामध्ये दाण्याला फुटले अंकूर

सुरेश पाचभाई, बोटोणी: बोटोणी परिसरात गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील तूर, कापुस तर रबी हंगामातील गहू, हरभरा पिकांचे नुकसान होत आहे. यात सर्वाधिक फटका हा तूरीला बसतोय. अवकाळी पावसामुळे तुरीच्या बांधलेल्या पेंढ्यांमध्ये दाण्यांना अंकुर फुटले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतक-यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे.

मारेगाव तालुक्यातील एकूण 6200 हेक्टर क्षेत्रामध्ये तुरीची लागवड केली गेली आहे. यात बोटोणी परिसरात सुमारे 1500 हेक्टर क्षेत्रामध्ये तुरीची लागवड करण्यात आली आहे. बोटोणी परिसरात बोटोनी, सराटी, घोगुलदरा, शिवणाळा, खेकडवाई, खंडणी, मेंढणी, जळका, आवळगाव, कान्हाळगाव (वा), पांडविहरी, अंभोरा, खैरगाव (भे), दुर्गाडा, वागदरा, वसंतनगर, म्हैसदोडका, रोहपट, मेंढनी, खेकडवाई, खडकी, बुरांडा, खापरी, हटवांजरी, धनपूर, घोडदरा, करणवाडी, सगनापूर शिवारात मोठ्या प्रमाणात शेतक-यांनी तुरीची लागवड केली आहे.

परिसरात जून महिन्याच्या दुस-या व तिस-या आठवड्यात शेतक-यांनी तुरीची पेरणी केली होती. सध्या तुरीच्या कापणीची वेळ आहे. अनेक शेतक-यांनी कापणी केली आहे. तर अनेक शेतकरी कापणीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र गेल्या 5 दिवसांपासून बोटोणी परिसरात अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. परिसरात या वर्षी तुरीचे चांगले पिक आले आहे. शेतक-यांनी तुरीची कापणी करून शेतात त्याचे ढिगारे केले आहे. मात्र सततच्या अवकाळी पावसामुळे तुरीचे ढिगारे भिजले आहे. त्यामुळे दाण्यांना कोंब फुटत आहे. शिवाय दाणे काळवंडले आहेत.

अवकाळी पावसाचा गहू, हरबरा व कापसालाही फटका
सध्या परिसरात धगाळ व दमट वातावरण आहे. त्यामुळे चणा पिकांवर बुरशी रोगांचा प्रादूर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम चणा उत्पादनावर होऊ शकतो. परिसरातील काही भागातील शेतक-यांच्या कापसाची वेचणी बाकी आहे. पावसामुळे पिकांवर असलेला कापूस भिजला आहे. त्यामुळे त्याचाही परिणाम उत्पादनावर होत आहे.

अवकाळी पाऊस शेतक-यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिसकावत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष घेऊन शेतक-यांना योग्य ती मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

हे देखील वाचा:

मेंढोली गावात अवैध दारूविक्रीला उधाण, गावकरी संतप्त

आधी मीच राहणार आतला…. गर्भवती झाल्यावर मी नाही त्यातला…

Comments are closed.