दारूचे दुकान हटविण्यासाठी एल्गार, महिलांची स्वाक्षरी मोहीम सुरू
भांडण-तंट्यात वाढ तरुणीसह महिलांना त्रास
सुशील ओझा, झरी : तालुक्यातील मुकुटबन येथे अनेक वर्षांपासून गावाच्या मध्यभागी वॉर्ड क्रमांक २ मध्ये बीयर बार व देशी दारूचे दुकान सुरू आहे. दारूच्या दुकानात दिवसरात्र मद्यपिंची वर्दळ राहात असून, भांडण-तंट्यात वाढ झाली आहे. मद्यपिंचा तरुणीसह महिलांनाही त्रास सहन करावा लागत आहे. गावातील दारूचे दुकान हटविण्यासाठी महिलांनी एल्गार पुकाराला असून, स्वाक्षरी मोहिमेला प्रारंभ केला आहे. .
मुकुटबन येथे बीयर बार व देशी दारूचे दुकान असून, परिसरातील खडकी, गणेशपूर, अडेगाव, कोसारा, खातेरा, आमलोन, वेडद, रुइकोट, अर्धवन, पांढरकवडा (ल.), हिवरदरा, पिंपरड, बैलमपूर आदी गावांतील शेकडो मद्यपि दारू पिण्याकरिता येतात. गावात सिमेंट कारखान्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या कामावर दोन हजार कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे गावात पुन्हा नागरिकांची रेलचेल वाढली आहे. सकाळी ७ वाजेपासून तर रात्री १० वाजेपयंर्त मद्यपिंची वर्दळ राहात असून, भांडण-तंट्यात वाढ झाली आहे.
वॉर्ड क्र. २ मधील मुख्य मार्गावर ही दारूचे दुकान असून, त्या भागात मार्के ट आहे. यामुळे गावकऱ्यांसह महिला व तरुणींना त्रास सहन करावा लागत आहे. गावातील मासोळी व चिकन विक्री बंद करून गावाच्या बाहेर भाजी मार्केटच्या यार्डात सुरू करण्याचा निर्णय माजी सरपंच प्रमोद बरशेट्टीवार यांनी घेतला. त्यामुळे सर्वांची बैठक घेऊन दुकान बाहेर काढण्यात आले. त्यामुळे गावातील दारू दुकान बंद करण्यासाठी सरपंच लाकडे यांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी केली आहे. दारू बंद करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम उभारली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे..