मारेगावमध्ये मंगळवारी ‘दे झटका’ मोर्चाचे आयोजन
कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात सर्वसामान्यांचा एल्गार
ज्योतिबा पोटे, मारेगाव: वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात मारेगाव येथे मंगळवारी 30 जुलै रोजी ‘दे झटका’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा दुपारी 11 वाजता नगर पंचायत मैदान ते वीज वितरण कार्यालय असा निघणार आहे. या मोर्चाचे आयोजन पीडित वीज ग्राहक समितीद्वारे करण्यात आले असून मोर्चाचे नेतृत्व डॉ. महेंद्र लोढा करणार आहे.
वीज वितरण कंपनीचा गलथान कारभारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ग्राहकांना अवैधरित्या अव्वाच्या सव्वा बील पाठवणे, सारखे होणारे भायनियमन, गेल्या दोन तीन वर्षांपासून जोडणीचे शुल्क भरूनही अद्याप वीज जोडणी न करणे, कृषी पंपासाठी अनियमीत पुरवठा करणे, वीज चोरीचा भुर्दंड सर्वसामान्यांच्या माथी मारणे अशा एक नव्हे तर अनेक कारणांमुळे वीज वितरण कंपनी चर्चेत राहते. याचा फटका केवळ गरीबच नाही तर सर्व स्तरातील ग्राहकांना बसत आहे.
अवैध रित्या दिलेले अव्वाच्या सव्वा वीज बील रद्द करा, तात्काळ वीज जोडणी करा, भारनियमण रद्द करा, कृषी पंपासाठी सुरळीत वीज पुरवठा करा, गावातील नादुरुस्त डीपी तात्काळ दुरुस्त करा, लाईनमनच्या मनमानी कारभाराला आळा घाला. अशा प्रमुख मागण्या घेऊन दे ‘झटका’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चात मारेगाव तालुक्यातील प्रत्येक गावातील वीज वितरण कंपनीच्या पीडित ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पीडित वीज ग्राहक समिती, मारेगाव तालुकाच्या वतीने करण्यात आली आहे.