पती, पत्नी आणि ‘वो’…? महिलेचा अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मोहदा येथील एका खाणीच्या तळ्यात आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास एका महिलेचा कुजलेल्या व संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सरिता राजन पंडित (22) असे मृत महिलेचे नाव असून खाण परिसरातच आपल्या पतीसह राहात होती. सदर महिलेच्या गळ्यात फास होता व मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. त्यामुळे शिरपूर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान महिलेचा पती दोन ते तीन दिवसांपासून फरार असल्याची माहिती आहे. त्यामुळे हे प्रकरण पती, पत्नी आणि वो… असा संशय व्यक्त केला जात आहे.

Podar School 2025

तालुक्यातील मोहदा परिसरात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात गिट्टी खदाणी आहेत. या खाणीत बिहार व झारखंड येथील शेकडो मजूर काम करतात. परिसरातील वेगवेगळ्या खाणीत ते ऑपरेटर, ड्रायव्हर, जेसीबी चालक व मजुरी इत्यादी कामे ते करतात. तसेच हे कामगार खाणीजवळच झोपडी बांधून राहतात. याच परिसरातील एका गिट्टी खाणीत फरार असलेला पती काम करतो.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्राप्त माहितीनुसार, काही दिवसांआधी मृत सरिता राजन पंडित (22) रा. बिहार हिला तिचा पती एका दुस-या महिलेसोबत राहत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ती तात्काळ बिहार येथून मोहदा येथे आली होती. त्यानंतर ती पती व एका महिलेसह सोबत राहत होते. मात्र आज मंगळवारी दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास एका बंद असलेल्या खाणीमुळे तयार झालेल्या एका तळ्यात एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

पोलिसांनी माहिती काढली असता त्यांना सदर महिलेचा पती व त्याच्यासोबत राहत असलेली महिला दोघेही फरार असल्याचे कळले. तसेच महिलेच्या गळ्यात फास होता व तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा अधिक तपास शिरपूर पोलीस करीत आहे. मृत महिला ही आठ दिवसांआधीच मोहदा येथे आली असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांआधीच वांजरी जवळील एका खाणीच्या तळ्यात तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला होता.

Comments are closed.