पाणी काढताना विहिरीत पडल्याने शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू

फवारणीसाठी पाणी काढताना गेला तोल, कान्हाळगाव येथील घटना

भास्कर राऊत, मारेगाव: शेतामध्ये कपाशीवर फवारणीसाठी विहीरीवर पाणी काढायला गेलेल्या शेतक-याचा तोल जाऊन विहिरीत पडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान कान्हाळगाव (वाई) येथे ही घटना घडली. मृत शेतकऱ्याचे नाव प्रमोद भाऊराव काकडे (48) असे आहे. 

कान्हाळगाव(वाई) येथील शेतकरी प्रमोद काकडे यांच्याकडे 7 एकर शेती आहे. त्यांनी या वर्षी नव्यानेच चार एकर शेती विकत घेतली होती. सध्या त्यांच्या शेतात फरवारणीचे काम सुरू होते. गुरुवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी ते आपल्या लहान भावासोबत कपाशी या पिकावर फवारणी करण्यासाठी शेतमध्ये गेले होते.

दुपारी त्यांच्या शेतात फवारणीचे काम सुरू होते. दुपारी 4 वाजताच्या सुमारास फवारणीचे पाणी संपल्याने ते 15 लीटरची बादली घेऊन शेतातील विहिरीत पाणी आणण्यासाठी गेले. विहिरीतून पाणी काढताना प्रमोद यांचा तोल गेला व ते विहिरीत पडले. प्रमोद यांना पोहता येत नव्हते. तर त्यांच्या लहान भावालाही पोहता येत नव्हते. मोठा भाऊ विहिरीत पडल्याचे लक्षात येताच त्यांच्या लहान भावाने मदतीसाठी गावाकडे धाव घेतली. मात्र प्रमोद यांचा मृत्यू झाला.

प्रमोद यांची गावात एक मेहनती शेतकरी म्हणून ओळख होती. त्यांच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. शेतक-याचा अपघाती मृत्यु झाल्याने त्याच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदतीची मागणी होत आहे. त्यांचे मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

हे देखील वाचा:

माजी नगराध्यक्ष व सुप्रसिद्ध व्यावसायिक सतिशबाबू तोटावार यांचे निधन

Comments are closed.