विवेक तोटेवार, वणी: लालगुडा येथील बेपत्ता असलेल्या इसमाचा अखेर चार दिवसानंतर मृतदेह आढळून आला. भालर रोडवरील एस ऑईल मीलजवळील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला. ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. मृतकाच्या कुटुंबियांनी विद्यूत प्रवाहाने मृत्यू झाल्याचा आरोप करत वणी पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली होती.
विकास रामदास शंकावार (40) हा लालगुडा येथील रहिवासी आहे. तो भुकटी तयार करण्याच्या कारखान्यात काम करीत होता. 23 सप्टेंबरला विकास नेहमीप्रमाणे कामाला गेला. त्याच्या घरी म्हशीचे पिल्लू असल्याने तो चारा आणण्यासाठी जीएस ऑईल मिल जवळील शेतात जायचा. सोमवारी विकास कामावरून परत येताना जीएस ऑईल मिलजवळील शेतात गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. अखेर दिनांक 26 सप्टेंबरला गुरुवारी त्याचा मृतदेह आढळून आला.
विद्युत प्रवाहामुळे मृत्यू, कुटुंबियांचा आरोप
विकासची सायकल व गवताची पेंढी शेतात सापडली. शेतात शेतमालाचे रक्षण करण्यासाठी विद्युत प्रवाह लावण्यात आला आहे. त्या प्रवाहाचा धक्का लागून विकासचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. विकासचा अपघाती मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत टाकला असाही आरोप करण्यात आला.
विद्युत प्रवाहामुळे मृत्यू ?
संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास मृतकाचे नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली होती. शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहामुळे मृ्त्यू झाला असून त्याच्या मृत्यूला शेतमालक जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान ग्रामीण रुग्णालयाचा मेडिकल रिपोर्ट आला. ज्यामध्ये फुफुसात पाणी गेल्याने मृत्यू झाल्याचे कारण देण्यात आले. विद्युत प्रवाहाने मृत्यू झाल्यास फुफ्फुस जळतात व त्यात पाणी जात नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा चहूबाजुंनी पोलीस तपास करीत आहे.