स्थानिकांचा लोढा हॉस्पिटलवर धावा, विरोधामुळे काम थांबवले

जर प्रशासन सुरक्षा देत असेल तरच कामाला सुरुवात - डॉ. लोढा

0

जब्बार चीनी, वणी: डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलवरून आता चांगलेच नाट्य रंगत आहे. स्थानिक नगरसेवकाच्या नेतृत्वात आज शेकडो स्थानिक लोकांनी लोढा हॉस्पिटलवर धावा बोलला व तिथे सुरू असलेले काम थांबवले. दरम्यान जोपर्यंत प्रशासन सुरक्षा देत नाही तो पर्यंत काम सुरू करणार नाही असा पवित्रा लोढा हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र लोढा यांनी घेतला. त्यामुळे वणीत डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आता होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

13 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना जाहीर करून जिल्ह्यातील 7 खासगी रुग्णालय ताब्यात घेऊन तिथे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तयार करावे असा आदेश दिला होता. त्यात वणीतील तेली फैल येथील लोढा हॉस्पिटलचाही समावेश होता. जिल्हाधिकारी यांनी दिनांक 18 सप्टेंबर पर्यंत हॉस्पिटल तयार करावे असे आदेश दिले होते. आदेशावरून लोढा हॉस्पिटलने तयारी पूर्ण करण्यास अपुरा वेळ असल्याचे सांगत डेडलाईन वाढवून मागितली. वणीत 25 सप्टेंबर रोजी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू होणार आहे. सध्या त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान तेली फैल येथील नागरिकांनी वस्तीत कोविड हॉस्पिटल नको म्हणून त्याला विरोध केला. आज शनिवारी दुपारी स्थानिक नगरसेवक प्रशांत निमकर यांच्या नेतृत्वात शेकडो लोकांनी लोढा हॉस्पिटलवर धावा बोलला. यावेळी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यासह  मोठ्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या. त्यांनी तिथे हॉस्पिटल होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. एकाच वेळी मोठ्या संख्येने लोक आल्याने तिथे काम करणारे लोक घाबरले. त्यानंतर डॉ. महेंद्र लोढा यांनी हॉस्पिटलचे काम थांबवित असल्याचे स्पष्ट केले.

प्रशासनाने सुरक्षा दिली तरच काम सुरू करणार – डॉ. महेंद्र लोढा 
मी लो़ढा हॉस्पिटल येथे कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली नव्हती. जिल्हाधिकारी यांनी हॉस्पिटल ताब्यात घेत तिथे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचा आदेश दिला. त्यानुसार हॉस्पिटलमध्ये काम करण्यास सुरूवात झाली. अर्धेअधिक काम झाले आहे. मात्र आता स्थानिकांचा आक्रमक पवित्रा बघता तिथे काम करणारे लोक घाबरले आहेत. त्यामुळे मी काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जर प्रशासनाने सुरक्षा दिली तरच कोविड रुग्णालय तयार करण्याचे उर्वरित काम पूर्ण केले जाईल. अन्यथा काम थांबवण्यात येईल.
– डॉ. महेंद्र लोढा

डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल काय आहे?
कोविडच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी सन 1897 च्या महामारी कायद्यानुसार वणीतील लोढा हॉस्पिटल ताब्यात घेतले आहे. तिथे कोविड संदर्भात उपचार होणार होता. कोरोना बाधीत गर्भवती महिलेची प्रसुती, कोरोना बाधीत रुग्णांचा अपघात, कोरोनाबाधित रुग्णांचे ऑपरेशन, कोरोनाबाधित बाळ इत्यांदींवर तिथे उपचार केला जाणार आहे. त्यानुसार तिथे सिटीस्कॅन, कोरोना टेस्ट लॅब, ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन पुरवठा असलेले बेड इ. तयार करण्यास सुरूवात झाली. हे डेडिकेटेड हॉस्पिटल खासगी असून मल्टिस्पेशालिटी राहणार आहे. तिथे शासनाने दिलेल्या दरानुसार उपचार केला जाणार आहे. दरम्यान लोकांचा विरोध बघता त्याचे काम थांबवण्यात आले आहे.

सध्या खासगी कोविड हॉस्पिटलवरून चांगलेच नाट्य रंगत आहे. डॉ. महेंद्र लोढा आणि डॉ. गणेश लिमजे यांच्या पुढाकाराने आधी सत्यसेवा हॉस्पिटल झेडपी कॉलनी येथे खासगी कोविड हॉस्पिटल सुरू होणार होते. तिथे काम सुरू झाले होते. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे हे काम थांबवण्यात आले होते. त्यानंतर इतर ठिकाणांची चाचपणी सुरू असतानाच जिल्हाधिकारी यांचा लोढा हॉस्पिटल येथे डेडिकेटेड हॉस्पिटल करावे असा आदेश धडकला.

कोविड हॉस्पिटलवरून ‘डेडिकेटेड’ राजकारण?
लोढा हॉस्पिटल येथे कोविड हॉस्पिटल करण्याचा आदेश धडकताच त्यावरून राजकारण सुरू झाल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगत आहे. परसोडा येथील कोविड सेंटरबाबत तिथल्या रुग्णांच्या वारंवार तक्रारी येत होत्या, रुग्णांनी तिथल्या गैरसोयीबाबत अनेक व्हिडीओ व्हायरल केले पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचा आदेश येताच ट्रामा सेंटरला कोविड केअर सेंटर करण्याच्या हालचालींना वेग आला, असाही आरोप होतोय. तर दुसरीकडे लोढा हॉस्पिटललाही विरोध वाढत आहे. मध्यवस्तीत कोविड हॉस्पिटल नको असा एक मतप्रवाह आहे. तर डेडिकेटेड हॉस्पिटल झाल्यास त्याचा परिसरातील रुग्णांनाच फायदा होणार तसेच नागपूर सारख्या ठिकाणी उपचारासाठी जाण्याची गरज भासणार नाही असा दुसरा मतप्रवाह आहे. दरम्यान राजकारणातून हा वाद वाढवला जात आहे अशीही चर्चा शहरात रंगत आहे. 

सध्या लोढा हॉस्पिटल येथे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचे काम थांबवण्यात आले आहे. हॉस्पिटल होऊ देणार नाही असा पवित्रा स्थानिक रहिवाशी व स्थानिक नगरसेवकाने घेतला आहे. तर पुरेशी सुरक्षा दिली तरच हॉस्पिटल तयार करण्याचे काम सुरू होईल असा पवित्रा डॉ. लोढा यांनी घेतला आहे. आता प्रशासन हॉस्पिटलला सुरक्षा पुरवणार की स्थानिकांच्या विरोधापुढे नमणार हे लवकरच स्पष्ट होईल.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.