बालाजी जिनिंग मधील आगीच्या घटनेची सखोल चौकशीची मागणी
बाजार समिती, सीसीआय, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
संजय लेडांगे, मुकुटबन: मुकुटबन येथील बालाजी जिनिंग फॅक्टरीमध्ये दि. 9 जून रोजी सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाच्या गंजीमध्ये आग लागून लाखोंचा कापूस जळाला असून सदर घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी झरी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सुशील हरिशंकर ओझा यांनी केली आहे.
व्यवस्थापकीय संचालक सीसीआय मुंबई , जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा उपनिबंधक, सह.संस्था यवतमाळ, तहसीलदार झरीजामनी, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती झरी व ठाणेदार, पो.स्टे. मुकुटबन याना दिलेल्या तक्रारीत सुशील ओझा यांनी मुद्देनिहाय चौकशीची मागणी केली आहे.
तक्रारीत सीसीआयचे मुकूटबन केंद्रातील ग्रेडर व जिनिंग मालक यांच्या संगनमताने हमी भावात शासकीय कापूस खरेदीत लाखों रुपयांचा घोटाळा करण्यात आला असून असून भ्रष्टाचार लपविण्यासाठी जाणून बुजून खराब कापूस जाळण्यात आल्याचे आरोप करण्यात आले आहे. तसेच आगीत फक्त 50 ते 60 क्विंटल कापूस जळाले असता पंचनामा व पोलीस ठाण्यात 1600 क्विंटल कापूस जळाल्याची खोटी तक्रार नोंदविण्यात आली.
ट्रॅक्टरच्या सायलेंसरच्या ठिणगीमुळे कापसाच्या गंजीत आग लागल्याचा ग्रेडरचा दावा धादांत खोटा असून जिनिंग मधील सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी करने, जिनिंग मधील फायर फायटर बांबू बंद असल्याची चौकशी करण्यात यावी. बालाजी जिनिंग मधील खाजगी खरेदी व सीसीआयच्या खरेदीचे आकडे तपासण्यात यावे. संपूर्ण घटनेची वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशी करून जिनिंग मालक व ग्रेडरला अटक करून गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी सुशील ओझा यांनी तक्रारीत केली आहे.