विजेची मागणीत घट, तरीही कृषी पंपाना 8 तास वीज

शेतीसाठी किमान 12 तास वीज देण्याची मागणी

0

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना संकटामुळे सुरू असलेल्या लॉकडाउन काळात राज्यात विजेची मागणीत 50 टक्का इतकी घट झाली असतांना कृषी पंपाना मात्र पूर्वीप्रमाणेच 8 ते 10 तास वीज पुरवठा करण्यात येत आहे. आता लोडशेडिंग कमी करणे शक्य असल्याने शेतीसाठी किमान 12 तास वीज देण्याची मागणी होत आहे.

महानिर्मिती (महाजेनको) ही राज्य सरकारची वीज कंपनी आहे. ही कंपनी दररोज १० हजार ६०० मेगावॉट विजेची निर्मिती करते. हा सर्व पुरवठा राज्य सरकारच्याच महावितरण या वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीला केला जातो. पण लॉकडाऊनमुळे उद्योग, कारखाने, कार्यालये, अनेक दुकाने बंद आहेत. यामुळे उच्च दाब श्रेणीतील उद्योग तसेच व्यावसायिक ग्राहकांकडील मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी महावितरणाची मागणीच कमी झाल्याने महानिर्मितीनेही उत्पादन कमी केले आहे.

सध्या उन्हाळी पिकांची पेरणी, कुठे सिंचनाचे काम सुरू झालेले आहे. शेतकरी यासाठी दिवसभर शेतात काम करीत असतो. मात्र, वीज नसल्याने त्याला रात्री जागरण करीत मूग, तीळ, मक्का या पिकांना रात्रभर शेतात उभे राहुन पाणी द्यावे लागत आहे.

सिंचनाचे काम करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातच वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर रोहित्रांवर अनेक तांत्रिक बिघाड होत असतात. ते दुरुस्तीसाठी रात्रीच्या वेळी धावपळ करावी लागते. त्यामुळे शेतकरी दिवसा वीज पुरवठा मिळावा, अशी मागणी करीत आहेत.

शेतीला दिवसा किमान १२ तास वीज आवश्यक आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच घोषणा केली आहे. प्रत्यक्षात ती नीट अजून मिळालेली नाही. तेलंगणासारखं छोटं राज्य मोफत २४ तास वीज देण्याचं ठरवतं. हे विशेष आहे. आपल्या सरकारनं किमान दिवसा, तरी नियमित १२ तास वीज द्यावी. ती मोफत नसावी. मात्र ती महागही नसावी.
– वासुदेव विधाते, शेतकरी, मार्की ता. झरी, जि. यवतमाळ

शेतकऱ्यांना वीज कंपनीने निर्धारित केलेले प्रति-दिन प्रमाणे, दिवसा पुरवठा असेल तर आठ तास आणि रात्रीला पुरवठा असेल तर दहा तास याप्रमाणे आहे. परंतु बहुतांश ठिकाणी वितरण व्यवस्था अपुरी असल्याने वीज वितरणचे स्थानिक अधिकारी, कंपनीच्या परिभाषेत ‘फोर्सड लोडशेडिंग’ लागू करतात. अशा परिसराला त्यांच्या नियमानुसार ते केवळ पाच तास वीज पुरवतात. शिवाय निर्धारित कालावधीत होणारा वीजपुरवठाही अत्यंत व्यत्ययकारी वा अनियमित म्हणजे तास-दोन तासाला गायब होत असतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.