सावधान…! दर दोन तासाला ATM चे निर्जंतुकीकरण नाही

बँक व ठेकेदारांचे ग्राहकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

0

जब्बार चीनी, वणी: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार कर्मचारी मास्क, सॅनिटायझर, हॅड ग्लोव्हज वापरत आहेत. एका वेळी केवळ चारच ग्राहकांना बॅंकेत सोडले जात आहे. सोशल डिस्टन्स पाळले जात आहेत. यासह बँकांनी एटीएम दर दोन तासाला सॅनिटायझरने स्वच्छ करण्याचे निर्देशही देण्यात आले असतानाही कुठल्याच बॅंका व ठेकेदारांतर्फे एटीएमची स्वच्छता करण्यात येत नसल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.

एटीएमवर पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक येतात. यामुळे या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणून दर दोन तासाला एटीएमची स्वच्छता करावी, अशा सूचना बॅंकांना देण्यात आल्या आहेत. मात्र बॅंका या सूचनांचे पालन करताना दिसून येत नाही. एटीएमची जबाबदारी काही ठेकेदारांना दिल्यामुळे, त्या ठेकेदारांकडून एटीएमची स्वच्छता करण्यात येत नाही. यामुळे बहुतांशी एटीएम हे अस्वच्छ आहेत यासह या विषाणूंचा प्रादूर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे.

प्रत्येक एटीएमवर एसी लावण्यात आल्याने विषाणू येथे जास्त काळ टिकून राहू शकतो. यामुळे रिझर्व्ह बॅंकेने दर दोन तासाला सॅनिटायझरने स्वच्छ करण्याच्या सूचना बॅंकांना केल्या आहेत. मात्र , याकडे बॅंक आणि एटीएमचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले ठेकेदार दुर्लक्ष करीत आहेत. एखादा कोरोना विषाणूचा बाधित रूग्ण एटीएमवर गेल्यास त्याचा प्रसार सर्वत्र होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आपण एटीएममध्ये जात असाल तर सावधान राहा. एटीएमवर पैसे काढल्यानंतर त्यांनी सॅनिटायझरने हात स्वच्छ करा.

Leave A Reply

Your email address will not be published.