अवैध दारू विक्री बंद करा, महिला धडकल्या ठाण्यावर
कायदा हाती घेण्याचा नरसाळ्यातील महिलांचा इशारा
नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील नरसाळा येथे राजरोसपणे अवैध दारू विक्री होत आहे. ही बाब मारेगाव पोलीस प्रशासनाला वेळोवेळी लक्षात आणून दिली. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत कोणतीही कार्यवाही करत नाही असा आरोप करत नरसाळा येथील महिला थेट मारेगाव पोलीस ठाण्यात धडकल्या. जर पोलिसांनी अवैध दारूविक्री बंद केली नाही तर कायदा हातात घेऊ असा इशाराही महिलांनी दिला आहे. यावेळी त्यांनी मारेगावचे ठाणेदार जगदिश मंडलवार यांना निवेदन दिले.
कोरोनामुळे सुरू झालेले लॉकडाऊन अद्यापही पूर्णपणे हटलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा रोजगार गेला. काम धंदे बंद झाल्याने सामान्य कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच नरसाळा येथे अवैध दारूविक्रीला उत आला आहे. गावात राजरोसपणे दारूची अवैधरित्या विक्री होत आहे.
त्यामुळे गावातील शाळकरी मुले, तरुण, गावकरी त्याच्या आहारी गेले आहे. व्यसनामुळे अनेकाचे संसार उघड्यावर पडत आहे. घरी व गावात तंट्याचे प्रमाण वाढले आहे असा आरोप करत महिलांनी अवैध दारूविक्री बंद करावी यासाठी निवेदन दिले आहे.
गावक-यांनी अवैध दारूविक्री वेळोवेळी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र पोलीस प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त महिलांनी मारेगाव पोलीस स्टेशनगाला धडक दिली. गावात चालू असलेली अवैध दारूविक्री तात्काळ बंद करा. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून कायदा हाती घेऊ असा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला.
यावेळी शारदाताई पांडे, बकुबाई मडावी, शालु भुसारी, वृंदा केराम, मंजुळा ठाकरे, मनिषा चिकराम, कोंडूताई किनाके, संगिता कडूकर, प्रभा नेहारे, लता भुसारी, तुळसा कुळसंगे, वनिता परचाके, बेबी गोवारकर, कमल येरचे, गुंफा गोवारकर, निर्मला उईके, दुर्गा चिकराम, गिता खंडरे, सरला तोडासे, मंगला उईके, सुवर्णा उईके आदी महिला उपस्थित होत्या.