जितेंद्र कोठारी, वणी: शैक्षणिक निमित्ताने शहरी भागात खाजगी वसतिगृह किंवा भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांचे लॉकडाउन काळातील घरभाडे माफ करावे. अशी मागणी मनसे प्रणीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वणी शाखातर्फे करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी कुटुंबाचे मुलं शिक्षणासाठी शहरात वसतिगृह किंवा खाजगी रूम भाडेतत्त्वावर करून राहत आहे. परंतु कोरोना महामारी व लॉकडाउनमुळे बहुतांश विद्यार्थी मार्च महिन्यात आपल्या गावी परतले आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यापासून विद्यार्थी राहत असलेले वसतिगृह व रूममध्ये कोणीही राहत नसताना घरमालकांकडून विद्यार्थ्यांना मागील तीन महिन्याचे भाडे चुकता करण्यासाठी त्रास दिल्या जात आहे.
यवतमाळ जिल्हा हा प्रामुख्याने शेती आधारित जिल्हा असून शहराच्या ठिकाणी शिकायला येणारे विद्यार्थी हे सर्व साधारण शेतकरी पाल्य आहे. कोरोना आजार आणि लॉकडाउनमुळे सर्वांवर उदरनिर्वाहचे संकट येऊन ठेपले आहे. अनेक मुलं शहरात मिळेल ती नौकरी करून आपले शिक्षण पूर्ण करीत होते. मात्र आता त्यांची नौकरी गेल्याने शिक्षण पूर्ण करणेच कठीण झाले आहे.
त्यामुळे खाजगी घरात भाडेतत्त्वावर राहत असलेल्या विद्यार्थ्यांचे माहे एप्रिल ते जून 2020 पर्यंतचे घरभाडे माफ करण्यासंबंधी परिपत्रक शासनाने काढावे. अशी मागणी निवेदनातून म.न.वि.से. वणी शाखा अध्यक्ष शुभम पिंपळकर यांनी केली आहे. निवेदनाची प्रत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम. देवेन्द्रसिंग याना पाठविण्यात आली आहे.