जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात लॉकडाउन नंतर राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस बंद करण्यात आले असून ज्या विद्यार्थी कामगार, कर्मचारी व अन्य पास धारकांनी एस.टी. बसमधून दैनंदिन, मासिक, त्रेमासिक व वार्षिक प्रवास पास काढले होते, त्या पासेसची मुदत वाढवून देण्याची मागणी संभाजी ब्रिगेड तर्फे करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन वणी आगार प्रमुख याना देण्यात आले आहे.
ज्या पासची लॉकडाऊन नंतर जेवढे दिवस मुदत शिल्लक आहे अशा सर्व पासधारकांना राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक सुरू होताच वाढीव मुदतीत प्रवास करता आला पाहिजे. म्हणून पासधारकांना मुदतवाढ द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी केली.
कोरोना आजार आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आले असता बँक, विमा, वीज वितरण व इतर शासकीय व खाजगी कंपन्यांनी ईएमआई भरणा मुद्दत वाढवून दिली आहे. राज्यात लवकरच शाळा, महाविद्यालय सुरू होणार आहेत तत्पूर्वी सर्व पासधारकांना मुदत वाढवून द्यावे. तसेच जिल्ह्यातील सर्व आगारांना सूचित करावे.
या मागणी बाबत सात दिवसात निर्णय न झाल्यास जिल्ह्यातील विद्यार्थी आणि कामगारांसह आपल्या कार्यालयावर धडक मोर्चा संभाजी ब्रिगेडच्या वतीने काढण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आले आहे. या वेळी संभाजी ब्रिगेडचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अजय धोबे, वणी तालुकाध्यक्ष विवेक ठाकरे, ॲड अमोल टोंगे, आषिश रिंगोले आदी उपस्थित होते.