सुशील ओझा,झरी:- तालुक्यात सध्या धडक सिंचन विहिरीचे काम जोरात सुरू आहे, मात्र या कामात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर येत आहे. निर्धारित खोली ऐवजी कमी फुटांची खोली करून ठेकेदारांकडून ही लूट केली जात आहे.
शासनाकडून शेतकऱ्याला एका विहिरी करीता २ लाख ५० हजार रुपये मिळते. या विहीरीची खोली ३० फूट व गोलाई २८ फूट खोदने आवश्यक आहे. विहीर खोदण्याकरिता शेतकऱ्याला ३५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत खर्च लागतो, तर विहीर बांधकामाकरिता ६० ते ७० हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र संबंधीत ठेकेदार पैसे वाचवण्यासाठी विहिरीची खोली ३० फूटांऐवजी १५ ते २० फूट खोल खोदून लाखो रुपये कमवित आहे. गरजू शेतकऱ्यांच्या नावावर विहीर मंजूर करणे व वरील प्रकार करणे हे नित्याने चालू आहे. याला संपूर्ण मदत पंचायत समितीचे संमधीत अधिकारीही करीत असून तेही विहिरीचे बिल बिनधास्तपणे पास करून देत आहे.
या विहिरी ठेकेदाराशिवायही खोदता येतात. मात्र जे शेतकरी स्वतः विहीरचे काम ठेकेदार न लावता करीत आहे, अशा शेतकऱ्यांचे बिल १० चकरा मारूनही पास होत नाही. तालुक्यात जवळपास ७० ते ८० ठेकेदार असून बहुतांश ठेकेदार राजकीय पुढारी व कार्यकर्तेच आहे. यांच्याच दबावाखाली पंचायत समिती असून जास्तीत जास्त विहिरीचे बिल पास करून घेतल्या जात आहे.
अनेक ठेकेदार तर १५ फुटच विहीर खोदून शेतकऱ्यांना सांगतात की विहिरीला पाणी लागत नाही कशाला जास्त खर्च करता. पाटण येथील एका शेतकऱ्याने तर जुनी विहीर दाखवून अडीच लाख उचलल्याची चर्चा आहे.
तालुक्यात दोन वर्षांत शेकडो विहिरी मंजूर झाल्या. परंतु या विहिराचा फायदा शेतक-यांऐवजी ठेकेदारांनाच झाल्याचे पहायला मिळत आहे. पंचायत समिती मध्ये सध्या राजकीय ठेकेदारांची गर्दी पाहायला मिळत असून शेतकऱ्यांचे हाल होत आहे. शासनाची योजना शेतक-यांसाठी आहे की फक्त ठेकेदारांसाठी आहे असा प्रश्न संतप्त शेतकरी विचारीत आहे.