धम्मरॅली आणि महानाट्याने विशाल बौद्ध धम्म परिषदेचा समारोप
महेश लिपटे,राजूरः येथील दिक्षाभूमी बहुउद्देशीय संस्थेद्वारा 3 दिवसीय विशाल बौद्ध धम्म परिषदेचा थाटात समारोप झाला. तीन दिवस जणू एक वैचारिक मेजवाानीच मिळाली. विविध विषयांवरील व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे आणि प्रश्नोत्तरांनी ही परिषद अत्यंत महत्त्चाची ठरली. महाराष्ट्रातील अनेक विषयतज्ज्ञ आणि अभ्यासक या परिषदेला आवर्जून उपस्थित होते. समारोपाच्या दिवशी या तीन दिवसांचा आढावा घेण्यात आला. सकाळी राजूर कॉलरी परिसरातून धम्म मिरवणूक निघाली. सायंकाळी भोजनदान झाले.
सातारा येथील प्रकाशकुमार म. वाघमारे प्रस्तुत ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ हे महानाट्य सादर झाले. विषयाचा आवाका, उत्कृष्ट अभिनय, सादरीकरण व तांत्रिक बाजूंनी हे नाटक उपस्थितांच्या पसंतीस पडले. या नाटकाला उपस्थितांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. या तीन दिवस चाललेल्या धम्म परिषदेसाठी दीक्षाभूमी बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकर्ते, दीक्षाभूमी विहार समितीचे पदाधिकारी, सर्व बुद्ध-आंबेडकर अनुयायांनी, नागरिक व आयोजकांनी विशेष परिश्रम घेतलेत.