महेश लिपटे, राजूरः तीन दिवस चालत असलेल्या धम्मपरिषदेचा समारोप सोमवार दिनांक 30 एप्रिल रोजी होणार आहे. राजूर येथे 61 व्या धम्मदीक्षा सोहळादिन समारंभानिमित्त धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी 6.00 वाजता धम्म मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक दीक्षाभूमी बुद्धविहार, सावित्रीआई फुले चौक, रेल्वे स्टेशन, प्रज्ञा चौक, पंचशीलनगर, आंबेडकरनगर, बिरसामुंडा नगर ते दीक्षाभूमी या मार्गाने जाईल.
सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत बुद्धवंदना होईल. सकाळी 10 ते 12 या वेळात भदन्त ज्ञानज्योती व संघ संघारामगिरी यांचे धम्म प्रवचन होईल. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत तृतीय सत्र हे धम्मसंवादाचे राहील. धम्मसंवादाचा विषय ‘‘समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. आंबडकरांचे संविधानिक विचार दिशादर्शक आहेत’’ असा आहे. भदन्त ज्ञानज्योती, संघारामगिरी हे अध्यक्षस्थानी राहतील.
यात यवतमाळ येथील आंबेडकरी विचारवंत प्रा. अंकुश वाकडे, यवतमाळ येथील संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्रवीण देशमुख, कारंजा लाड येथील श्रीमती धाबेकर महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष गवई, बाभुळगाव येथील आंबेडकरी विचारवंत तेजस गुडधे, भद्रावती येथील समाजसेवक विशाल बोरकर या धम्मसंवादात सहभाग घेतील.
सायंकाळी 5 ते 6 भोजनदान होईल. सातारा येथील प्रकाशकुमार म. वाघमारे यांनी लिहिलेलं व दिग्दर्शित केलेलं महानाट्य ‘‘भीमा तुझ्या जन्मामुळे’’ सादर होईल. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.